मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. रश्मी शुक्ला यांची बुधवारी तब्बल दोन तास कसून चौकशी करत, कुलाबा पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉ. रश्मी शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना फोन टॅपिंग केले होते. यात खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या फिर्यादीवरून कुलाबा पोलिसांनी भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांना अटकेपासून संरक्षण देत १६ आणि २३ मार्च रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदविण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार, शुक्ला या बुधवारी सकाळी अकरा वाजता जबाब नोंदविण्यासाठी वकिलासोबत कुलाबा पोलीस ठाण्यात हजर झाल्या. पोलिसांनी शुक्ला यांच्याकडे चौकशी सुरू करत त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर त्या दुपारी दीडच्या सुमारास बाहेर पडल्या. त्यांनी काही कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत. त्यानुसार कुलाबा पोलीस अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे सायबर पोलिसांनी टेलिग्राफ ॲक्टनुसार, नोंदवलेल्या स्वतंत्र गुह्यातही सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पुण्यातही गुन्हा डॉ. रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल पाठवल्यानंतर शासनाच्या आदेशाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.