Join us

सायबर सेलच्या समन्सविरोधात रश्मी शुक्ला यांची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 5:39 AM

अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप; हैदराबाद, मुंबई काेर्टातही याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/ हैदराबाद : मुंबई पोलिसांनी संवेदनशील माहिती उघड केल्यावरून मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सविरोधात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयासोबतच मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी मानसिक छळ व त्रास देऊ नये, असे निर्देश देण्याची मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

गुन्हा नोंदविल्याने केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, तसेच पोलिसांनी शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई करू नये, अशी विनंती शुक्ला यांचे वकील समीर नांग्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली. न्यायालयाने ४ मे रोजी सुनावणी ठेवली.याचिकाकर्तीने पोलीस बदल्यांमध्ये राजकारणी व मंत्री कसा भ्रष्टाचार करतात, हे उघडकीस आणले. भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मोठे धैर्य दाखवले व कर्तव्यही पार पाडले आहे. या कामाबद्दल त्यांचे कौतुक करण्याऐवजी सरकार त्यांना नाहक बनावट व खोट्या प्रकरणांत गोवत आहे, असे याचिकेत नमूद आहे. पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्यासंदर्भात शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून वाद निर्माण झाला होता. शुक्ला यांनी परवानगी न घेता बेकायदा फोन टॅप केल्याचा आरोप राज्य सरकारने केला आहे.

शुक्ला सध्या सीआरपीएफ साऊथ झोनच्या अतिरिक्त पोलीस संचालक आहेत. त्यांची पोस्टिंग हैदराबाद येथे करण्यात आली आहे. ऑफिशियल सिक्रेट ॲक्टअंतर्गत बीकेसी सायबर पोलिसांनी अज्ञातांविरोधात फोन टॅपिंग व पोलीस बदल्यांप्रकरणी महत्त्वाचे, गाेपनीय दस्तावेज उघड केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना या दोन्ही घटना घडल्या आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसरश्मी शुक्ला