मुंबई-
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा देखील जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यापर्यंत अनेकांनी लता दीदींच्या निधनावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही लता दीदींच्या जाण्यावर भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरच्या मोठा आघात असल्याची प्रतिक्रिया रश्मी ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
"लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असंही त्या म्हणाल्या आहेत.
नाना पटोलेंनीही वाहिली आदरांजलीआपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
लतादीदींचे जाणे वेदनादायी- छगन भुजबळतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले असल्याच्या शोकभावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला- अजित पवारलतादिदींच्या निधनाने महाराष्ट्र आणि देशातल्या प्रत्येक घरात शोकाकूल वातावरण; लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी आद्वितीय होत्या,अशी गानकोकीळा पुन्हा होणे नाही. महाराष्ट्रकन्येच्या निधनाने देशाची हानी,लतादिदींची उणीव भरुन निघणं अशक्य आहे, असं अजित पवार म्हणाले.