मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुरुवारी भाजपच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रभारी जितेन गजारिया यांना ताब्यात घेतले होते. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्याची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले आहे. आता, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकप्रकारे जितेन गजारिया याचं अभिनंदन केलं आहे.
गजारिया यांनी ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi), असे म्हटले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला. याच प्रकरणात गुरुवारी गजारिया यांना ताब्यात घेत, त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यावेळी त्यांच्या वकिलाने गजारिया यांच्या ट्विटचे समर्थन केले. तसेच, मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे म्हणून ट्विट करता कामा नये, असा कायदा नाही. हे ट्विट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केल्याचे वकिलांनी म्हटले होते. आता, चंद्रकांत पाटील यांनीही या टविटवर भाष्य केलं आहे.
''जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडीदेवी म्हटलं यात काहीच गैर नाही. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी राज्य सांभाळलं होतं. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे रश्मी ठाकरे या देखील राबडीदेवी यांच्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळू शकतात, त्यामुळे राबडीदेवी म्हणून गजारिया यांनी रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली, फूलनदेवी म्हटलेलं नाही,'' अशा शब्दात राबडी देवी या उपमेचं पाटील यांनी समर्थन केलं होतं.
“एकंदरीत माझा तो बळवंतराव दुसऱ्यांचा तो बाब्या, असं महाविकास आघाडी सरकारचं चाललंय, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी महिलांबद्दल काहीही बोललं तरी चालतं, पंतप्रधानांवर टीका केली तरी चालते. पण भाजपामधील मंत्र्यांनी एक शब्द जरी बोलला तरी त्यांच्यावर कारवाई होते. भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हटलं होतं, फूलन देवी नाही, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, राबडीदेवी शिवी नाही” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गजारियांच्या वक्तव्याचं स्पष्ट शब्दाच समर्थन केलं आहे.
रश्मी वहिनींनाही मुख्यमंत्री करता येऊ शकते
"मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असणं स्वाभाविक आहे. कारण पदभार घेतला तर ते सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे," असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असंही चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी म्हटले होते.