Join us

टेक्स्टाइल म्युझियमसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने घेतला आक्रमक पवित्रा

By जयंत होवाळ | Published: January 04, 2024 7:46 PM

टेक्स्टाइल म्युझियम पूर्ण झाल्यावर उर्वरित जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यात यावी,असे मोहिते यावेळी म्हणाले.

मुंबई: मुंबईतील गिरण्या आणि गिरणगावाचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या टेक्स्टाइल म्युझियमसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने आक्रमक पवित्रा  घेतला आहे. "टेक्स्टाइल म्युझियमचे"थांबलेले बांधकाम त्वरित सुरू करा अन्यथा गिरणी कामगार बेमुदत उपोषणाला बसतील, असा‌ इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिला . 

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या पुढाकाराने इंदू मिल क्र.२/३च्या जागेवर गिरण्यांचा इतिहास जतन करणारे म्युझियम उभे रहात आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेली दोन वर्षे काम चालू होते‌.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी या स्थळाला भेट देऊन,गिरण्यांचा स्फूर्तिदायक इतिहास जतन करणारे हे टेक्स्टाइल म्युझियम आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्हावे,अशी मागणी केली होती.परंतु अचानकच गेले  सहा महिने बांधकाम बंद आहे. ते त्वरित चालू करावे या मागणीसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने गिरणगावात काळाचौकी येथे गुरुवारी निदर्शने करण्यात आली. 

सरकारने आता अधिक वेळ न काढता हे ऐतिहासिक काम पूर्णत्वाला न्यावे.  टेक्स्टाइल म्युझियम पूर्ण झाल्यावर उर्वरित जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी देण्यात यावी,असे मोहिते यावेळी म्हणाले. तर, खजिनदार निवृत्ती देसाई यांनी या संग्रहालयात कामगारांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे,अशी मागणी केली.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या घर योजनेचा आढावा घेतला.उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी‌.बी.गावडे यांनी आपल्या भाषणात  गिरण्यांचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा दायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पाअंतर्गत "कहाणी गिरणगावाची' ही चित्रफीत तयार करण्यात आली आहे.कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांचे तत्कालीन कामगार चळवळीचे कार्य येणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावे यासाठी स्वतंत्र दालन ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई