मुंबई – घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका रुग्णाचा डोळ्याखालील भाग उंदराने कुरतडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात जाऊन पीडित रुग्णाची पाहणी केली. त्याचसोबत या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित रुग्णाची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, अतिदक्षता विभाग हा सोयीच्या दृष्टिकोनातून तळमजल्याला असला पाहिजे. परंतु या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आल्यानंतरही उंदराने संबंधित रुग्णाचा डोळ्याखालील भाग कुरतडल्याची घटना घडली, ही गंभीर बाब आहे. संबंधित घटना परिचारिकेच्या लक्षात आल्यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावून योग्य ते उपचार करण्यात आले आहे. तरीसुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेच्या चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनास दिले असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
काय आहे घटना?
मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रुग्णाच्या डोळ्यानजीक भाग चक्क उंदाराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. श्रीनिवास यल्लपा असं या २४ वर्षीय रुग्णाचे नाव आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने राजावाडी रुग्णालयात श्रीनिवासला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याचं लिव्हर खराब असल्याचं समोर आलं. उपचार झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या रुग्णाच्या डोळ्याजवळ रक्त येत असल्याचं नातेवाईकांना दिसून आलं. तेव्हा उंदराने डोळे कुरतडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.