शाळेतील खिचडीत उंदरांची विष्ठा, मध्यान्य भोजनावर प्रश्नचिन्ह ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 09:06 PM2018-08-02T21:06:50+5:302018-08-02T21:26:12+5:30
महापालिका शाळा क्र-9 मध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीत विष्ठा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने शाळेतील मध्यान्ह पोषक आहारावर प्रश्नचिन्हे उभे राहिले असून संबंधितावर कारवाईचे संकेत पालिका प्रशासन अधिकारी मोहिते यांनी दिले.
उल्हासनगर : महापालिका शाळा क्र-9 मध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीत विष्ठा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने शाळेतील मध्यान्ह पोषक आहारावर प्रश्नचिन्हे उभे राहिले असून संबंधितावर कारवाईचे संकेत पालिका प्रशासन अधिकारी मोहिते यांनी दिले. उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांना महिला बचत गटामार्फत मध्यान्य पोषक आहार दिला जातो. गुरुवारी सकाळी 10 वाजता हिराघाट येथील पालिका शाळा नं- 9 मध्ये मुलांसाठी मध्यान्य जेवण आले. मुलांना खिचडीचे जेवणाचे वाटप करीत असताना, एका मुलाच्या ताटातील खिचडीत शिक्षकांना उंदराची विष्ठा आढळून आली.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या मध्यान्य जेणवातील खिचडीत उंदराची विष्ठा दिसल्याने मुख्याध्यापिका वर्षा खत्री यांना याबाबत माहिती दिली. खत्री यांनी तात्काळ झालेला सर्व प्रकार प्रशासन अधिकारी मोहिते यांना सांगितला. तसेच मोहिते यांना लेखी पत्रही दिले. याप्रकारची माहिती परिसरात होताच पालकांनीही शाळेत धाव घेतली. महापालिका आयुक्त व शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीनंतर कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, या घटनेने शाळेतील मध्यान्ह पोषण जेवणावर प्रश्नचिन्हं उभे राहिले आहे. यापूर्वी पालिका शाळेत मध्यान्य जेवणाबरोबर मुलांना चिक्की देण्यात येत होती. ती पुन्हा सुरू करण्याचा मागणी सर्वस्तरातून होत आहे. तर खिचडी वाटप करणाऱ्या महिला गटाने, हा महिला गटाविरुद्ध नियोजित कट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.