मुंबई : मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात आयसीयूमधील युवकाचा डोळा उंदराने कुरतडल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील ही पहिलीच घटना नाही. याआधीही २०१७मध्ये कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात एका महिला रुग्णाचा पाय, तर दुसऱ्या महिलेचा डोळा उंदराने कुरतडला हाेता.
श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर आणि यकृतासंबंधी समस्या हाेती. मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाइकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यांनी डोळे तपासले असता डोळ्याला उंदराने कुरतडल्याचे समोर आले. त्यांनी परिचारिकांना सांगितले. मात्र, त्यांनी उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आयसीयू तळमजल्यावर असल्याने येथे उंदरांचा वावर आहे. प्रथमदर्शनी उंदराने चावा घेतल्याचे दिसत असून याबाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.
चौकशीचे आदेश
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी रुग्णालयाला भेट दिली. खबरदारी घेतल्यानंतरही घडलेला हा प्रकार गंभीर आहे. रुग्णावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनास दिल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले.