लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टाटा या नाममुद्रेला जागतिक स्तरावर नेणारे, शालीन, सुसंस्कृत, द्रष्टे उद्योजक, प्राणिमात्रांवर पराकोटीचे प्रेम करणारे, नवउद्यमींना मदतीचा हात देणारे, राजस आणि लोभस व्यक्तिमत्त्व लाभलेले टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्यावर गुरुवारी वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उद्योग, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच प्रचंड जनसागर उपस्थित होता. एका युगाचा अस्त झाल्याची भावना यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.
रतन टाटा यांचे पार्थिव स्मशानभूमीतील प्रार्थनागृहात ठेवले होते. तेथे पारशी परंपरेतील ‘गेह-सारनू’चे वाचन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवण्यात आला. अखेरची शांती प्रार्थनेची प्रक्रिया म्हणून 'अहनवेती'चा संपूर्ण पहिला अध्याय वाचण्यात आला. प्रमुख २० नातेवाइकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन दिवस टाटा यांच्या निवासस्थानी उर्वरित विधी पूर्ण करण्यात येतील.
रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला. राज्यातील शासकीय कार्यालयांवरील ध्वजही अर्ध्यावर उतरविण्यात आले होते. राज्यातील विविध योजनांच्या उद्घाटनाचे शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते.
अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते राजपाल यादव तसेच रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा, जिम्मी नवल टाटा, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा समूहाचे संचालक मेनोश कपाडिया, वकील रायन करंजवाल, वकील झिया मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.
अश्रू अनावर
रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आणि व्हीआयपी मंडळी बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी सामान्य नागरिकांना स्मशानभूमीत जाण्यास परवानगी दिली. सामान्य नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
मान्यवरांनी घेतले अंतिम दर्शन
- एनसीपीए येथे रतन टाटा यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी ३ पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच सामान्य नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यात तरुणांची मोठी उपस्थिती होती.
- टाटा समूहातील कर्मचारीही दूरदूरवरून आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. दुपारी साडेतीननंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून तिरंग्यात लपेटून त्यांचे पार्थिव वरळी स्मशानभूमीत आणण्यात आले.
- एनसीपीए परिसरात मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. अनेक जण आपल्या मोबाइलमध्ये हा हळवा क्षण टिपून घेत होते.
मुंबईकरांची प्रचंड गर्दी
वरळी स्मशाभूमीबाहेर मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांचा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते.