Join us

रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 7:48 PM

Ratan Tata Hospitalized: टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले असल्याची माहिती रॉयटर्सने दोन सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Ratan Tata Hospitalized: प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले असल्याची माहिती रॉयटर्सने दोन सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. रतन टाटा हे ८६ वर्षांचे आहेत. दोनच दिवसांपूर्वी, ७ ऑक्टोबरला ते नियमित तपासणीसाठी ( Routine Check up) साठी रुग्णालयात गेले होते. त्यासंदर्भात त्यांनीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. पण सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. मात्र टाटा ग्रुपकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांची तब्येत खूपच खराब असल्याची बातमी प्रसारमाध्यमांतून आली होती. पण त्यानंतर त्यांनी एक निवेदन जारी करून ही बातमी अफवा असल्याचे म्हटले होते. तसेच टाटा यांनी त्यावेळी लोकांना आणि प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. मुंबईतील रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्यांना 'अफवा' म्हणत रतन टाटा यांनी ट्विटरवर लिहिले होते की, ते सारे दावे निराधार आहेत. वयोमानानुसार संबंधित असलेल्या आजारांमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. मी बरा आहे आणि तंदुरुस्तदेखील आहे.

रतन टाटा हे ८६ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांना वयाच्या २१ व्या वर्षी १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात 'लिस्टेड' झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले.

टॅग्स :रतन टाटामुंबईहॉस्पिटलटाटा