Join us

चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 6:27 AM

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक समूहात जवळपास १०० कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ भारतातच नाही, तर जगभर पसरलेल्या आहेत. या कंपन्या मिठापासून सोन्यापर्यंत अशा विविध क्षेत्राशी निगडित व्यवसाय करतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मीही इतरांप्रमाणे प्रेमात पडलो होतो, मात्र हे प्रेम पूर्ण झाले नाही, असे रतन टाटा एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. ते म्हणाले होते की, दूरचा विचार करता मी अविवाहित राहिलो हे एकप्रकारे योग्यच झाले, कारण जर मी लग्न केले असते तर परिस्थिती खूपच गुंतागुंतीची झाली असती. तुम्ही विचाराल की तुम्ही कधी प्रेमात पडला आहात का तर मी तुम्हाला सांगेन की, मी चार वेळा लग्न करण्याबद्दल गंभीर झालो होतो आणि प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे हटलो.

टाटा म्हणाले होते, मी अमेरिकेत काम करत होतो, तेव्हा मी कदाचित प्रेमाबाबत सर्वात गंभीर झालो होतो आणि मी भारतात परत आल्यामुळेच आम्ही लग्न करू शकलो नाही. माझ्या मैत्रिणीला भारतात यायचे नव्हते. हा भारत-चीन युद्धाचा काळ होता. शेवटी त्यांच्या प्रेयसीने अमेरिकेतच दुसऱ्याशी लग्न केले. त्यांच्या प्रेमात पडलेली मैत्रीण अजूनही शहरात आहे का, असे विचारले असता त्यांनी हो असे उत्तर दिले.

रतन टाटा यांना अनेकवेळा लग्नाचे प्रस्ताव आले होते पण कामात व्यस्त असल्याने ते लग्न करू शकले नाहीत. त्यावेळी मी एकतर बॉम्बे हाउसमध्ये राहत होतो किंवा कामासाठी प्रवास करत होतो. माझ्या जीवनशैलीमुळे कुणाला स्वत:ला बदलू लागू नये असे मला वाटत होते, त्यामुळेही मी लग्न केले नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

....पण नशिबाने काही वेगळेच ठरवले होते

अतिशय विनम्र व्यक्तिमत्त्व असलेले रतन टाटा यांना एकेकाळी वास्तुविशारद व्हायचे होते; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते. त्यांचे वडील नवल टाटा यांनाही त्यांच्या मुलाने मोठा अभियंता व्हावे, अशी इच्छा होती; पण, तसेही होऊ शकले नाही. ते जगातील प्रसिद्ध उद्योगपती झाले.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक समूहात जवळपास १०० कंपन्या आहेत. या कंपन्या केवळ भारतातच नाही, तर जगभर पसरलेल्या आहेत. या कंपन्या मिठापासून सोन्यापर्यंत अशा विविध क्षेत्राशी निगडित व्यवसाय करतात.

रतन टाटा यांना एका दिवसाला जवळपास ३८०० कोटी रुपये मिळत असे सांगितले जाते. टाटा संबंधित टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिस, टाटा टेलिसर्व्हिस (महाराष्ट्र), टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा इलेक्सी, टाटा गोल्ड एक्स्चेंच ट्रेड फंड, टाटा केमिकल, टाटा कन्झ्युमर प्राॅडक्ट्स शेअर बाजारात असून, म्युच्युयल फंडही अनेक आहेत. टाटाचे उत्पादन म्हटले की उत्पदनाची गॅरंटी हे समीकरण होते. उत्पादनाच्या दर्जाबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. 

टॅग्स :रतन टाटाटाटा