Join us

रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 7:48 AM

Ratan Tata Funeral : रतन टाटा यांचे पार्थिव एनसीपीए येथे अत्यंदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे अशी माहिती टाटा समूहाने दिली आहे.

Ratan Tata Demise: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांनी प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने  संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी बोलताना राज्यातील सर्व मनोरंजन आणि उत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. तसेच, त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगपतींपासून मनोरंजन, राजकारण आणि क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्यांचे पार्थिव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार आहे. राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ हा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. “आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी गेट ३ वरून एनसीपीए लॉनमध्ये प्रवेश करावा आणि बाहेर जाण्यासाठी गेट २ चा वापर करावा असेल. एनसीपीएच्या आवारात पार्किंगची जागा उपलब्ध नसणार आहे. दुपारी ४ वाजता, त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमी, डॉ ई मोसेस रोड, वरळी येथील प्रार्थना हॉलमध्ये अंतिम प्रवासाला निघेल,” असे टाटा समूहाने निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर मिळालेल्या प्रेम आणि सहानुभूतीबद्दल टाटा कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. "आम्ही, त्यांचे भाऊ, बहिणी आणि कुटुंबीय, ज्यांनी त्यांचे कौतुक केले त्यांच्याकडून अपार स्नेहाने सांत्वन स्विकारतो. ते यापुढे आपल्यात नसले तरी त्यांची नम्रता, औदार्य आणि हेतूचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील," असे टाटा समूहाने म्हटलं आहे. 

टॅग्स :रतन टाटाटाटामुंबईमुंबई पोलीस