मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना पालकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा यशवंतराव नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीतील या सोहळ्यास रतन टाटा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.नाना पालकर स्मृती समितीच्या माध्यमातून रूग्णसेवेचे कार्य केले जाते. विशेषत: रूग्ण आणि नातेवाईकांना उपचारादरम्यान निवास व भोजनाची सोय करणे, माफक दरात पॅथॉलॉजी व औषधांचा पुरवठा आणि रूग्णवाहिका पुरविण्याचे काम करते. सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीतील कार्यक्रमास रतन टाटा यांनी हजेरी लावली असली तरी त्यांनी भाषण मात्र केले नाही. याबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले की, उपस्थित श्रोत्यांप्रमाणे मीही टाटा यांचे भाषण ऐकायला उत्सुक होते. ते बोलणार नसल्याचे कळले तेंव्हा मी त्यांना त्याबाबत विचारले. तेंव्हा भाषण करताना संकोचल्यासारखे वाटते असे उत्तर टाटा यांनी दिले. जे लोक कठोर परिश्रम करतात ते क्वचितच बोलतात, असे सांगत भागवत यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली.सरसंघचालक पुढे म्हणाले, समाजकार्याची केवळ चर्चा केली जाते. पण या कार्याच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणा-यांसाठी नाना पालकर हे आजही प्रेरणादायी आहेत. जेंव्हा संसाधनांची कमतरता होती तेंव्हा कशाचीही वाट न पाहता, जमेल की नाही अशा प्रश्नात न अडकता समाजातील एका घटकाला आपली गरज आहे या जाणीवेने ते कार्य करत राहिले. प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार समाजकार्यात सहभागी होऊ शकतो. फक्त इच्छा आणि शुद्ध हेतू हवा. नाना पालकर यांनी आपले संपूर्ण जीवन रुग्णसेवेसाठी व्यतित केले. नानांचे स्मरण हे मार्ग अलौकिक करणारे स्मरण आहे. त्यांच्याप्रमाणेच प्रत्येकाने समाजकार्यात योगदान देण्याचा संकल्प करावा तरच आजच्या कार्यक्रमाचे सार्थक होईल, असे भागवत म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाना पालकर आणि नाना पालकर स्मृती समिती यांच्या कार्यावर ध्वनिचित्रफीत सादर करण्यात आली. तसेच शेषाद्री चारी यांच्या ‘सागा आॅफ इस्त्रायल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नाना पालकर यांच्या ‘इस्राएल - छळाकडून बळाकडे’ या पुस्तकावरून हे पुस्तक प्रेरित आहे.
रतन टाटा संघाच्या व्यासपीठावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:37 AM