‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 06:21 AM2024-10-10T06:21:14+5:302024-10-10T06:21:14+5:30

असे कोणतेही गाव नाही, असा कोणताही देश नाही जिथे टाटा हे नाव पोहोचलेले नाही. अतिशय नीतीमत्तेने तसेच आपल्या कर्तबगारीने रतन टाटा यांनी टाटा ब्रॅंड  जगभरात नेलाच, शिवाय भारताच्या आर्थिक विकासात त्यांनी मोलाचा हातभार लावला.

ratan tata sad demise know life journey grandma took care inspired the nano from the scooter and taught lesson to ford | ‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला

‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: असे कोणतेही गाव नाही, असा कोणताही देश नाही जिथे टाटा हे नाव पोहोचलेले नाही. पाच पिढ्यांनी अतिशय कष्टाने तयार केलेले टाटा नावाचे रोपटे जोपासण्याचे तसेच त्याचा जगभरात विस्तार करण्याचे काम रतन टाटा यांनी केले. अतिशय नीतीमत्तेने तसेच आपल्या कर्तबगारीने रतन टाटा यांनी टाटा ब्रॅंड  जगभरात नेलाच, शिवाय भारताच्या आर्थिक विकासात त्यांनी मोलाचा हातभार लावला.

रतन टाटा यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूल, त्यानंतर कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि शिमला येथील बिशप कॉटन स्कूल येथे शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी ते हार्वर्डला गेले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्येही
शिक्षण घेतले. रतन टाटा यांचे पहिले काम टाटा स्टीलच्या कार्यशाळेच्या कामकाजावर देखरेख करण्याचे होते. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांनी खुलासा केला होता की आपण चार वेळा लग्न करण्याचा प्रयत्न केला; पण, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते होऊ शकले नाही.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली, टाटा समूहाने हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक कार्यकारी केंद्र तयार करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर देणगी दिली, जिथे त्यांनी त्यांचे पदवीपूर्व शिक्षण घेतले. त्याला ‘टाटा हॉल’ असे नाव देण्यात आले. रतन टाटा यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६० च्या आसपास एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी केली होती. ‘फ्रॉम स्टील टू सेल्युलर’ आणि ‘द विट एंड विजडम ऑफ रतन टाटा’ यांसारखी पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. असे म्हटले जाते की रतन टाटा यांची एकूण संपत्ती सुमारे एक अब्ज डॉलर्स होती.

स्कूटरमधून मिळाली नॅनोची प्रेरणा

रतन टाटा हे नॅनो कारचे शिल्पकार. टाटाची ही एंट्री लेव्हल कार. लोकांची गाडी म्हणून याकडे पाहिले जात होते. दुचाकी चालवणाऱ्या भारतीय कुटुंबांसाठी परवडणाऱ्या कार बनविण्यासाठी त्यांनी ‘नॅनो’ची निर्मिती केल्याचे सांगितले होते. टाटा यांनी २०२२ मध्ये एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की, “भारतीय कुटुंब स्कूटरवर जाताना नेहमी बघत आलोय. आई-बाबा आणि त्यांच्यामध्ये मूल अशी ती सवारी असायची. त्यातून मला अशा वाहनाची निर्मिती करण्याची इच्छा झाली जी कुटुंबाची गाडी असेल आणि परवडणारीही असेल.”

२१ वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष

जेआरडी टाटा यांच्यानंतर रतन टाटा यांनी १९९१ मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जगातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीचे ते जवळपास २१ वर्षे अध्यक्ष होते. आयुष्यातील तब्बल ६ दशके ते टाटा कंपनीशी  निगडित राहिले. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत टाटा समूहाच्या कंपन्या आघाडीवर आहेत. 80 हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.

रतन टाटा अध्यक्ष असताना टाटा समूहाचा जगात झाला मोठा विस्तार

उद्योगपती रतन नवल टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. ते १९९० ते २०१२ पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष व ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७पर्यंत अंतरिम अध्यक्ष होते. ते टाटा समूहाच्या ट्रस्टचेही प्रमुख होते. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी दत्तक घेतलेले नवल टाटा यांचे रतन टाटा हे पुत्र होते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेजमधून त्यांनी आर्किटेक्चर विषयातील पदवी मिळविली. त्यानंतर टाटा स्टीलच्या शाॅप फ्लोअरवर त्यांनी काम केले. जेआरडी टाटा यांनी सेवानिवृत्ती पत्करल्यानंतर टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा अध्यक्ष बनले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली, जग्वार लँड रोव्हर, कोरस या कंपन्यांचे अधिग्रहण केले. त्यामुळे जगभरात टाटा उद्योग समूहाचा विस्तार होण्यास आणखी चालना मिळाली. टाटा उद्योग समूह हा समाजहिताची कामे करणारा व दानशूर वृत्तीचा म्हणून जगभरात ख्यातनाम आहे.

मुंबईत झाला जन्म

रतन टाटा यांचा जन्म मुंबईमध्ये २८ डिसेंबर १९३७ रोजी एका पारशी कुटुंबात झाला. टाटा यांचे वडील नवल टाटा हे टाटा घराण्यात दत्तक आले होते. नवल टाटा यांचे वडील होर्मुसजी टाटा हे रतन टाटा यांचे खरे आजोबा होत. ते टाटा कुटुंबीयांचे नातेवाईकही होते. १९४८ मध्ये जेव्हा रतन टाटा १० वर्षे वयाचे होते तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. त्यामुळे रतन टाटा यांचे संगोपन त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केले.

आर्किटेक्चरचे घेतले शिक्षण

रतन टाटा हे मुंबईतील कँपियन स्कूलमध्ये इयत्ता आठवीपर्यंत शिकले. त्यानंतर मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॉनन स्कूल, त्यानंतर शिमला येथील बिशप काॅटन स्कूल व न्यूयॉर्क शहरातील रिवरेडल कंट्री स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. कॉर्नेल विद्यापीठात आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना टाटा टाटा अल्फा सिग्मा फी संघटनेचे सदस्य झाले. २००८मध्ये, टाटा उद्योग समूहाने कॉर्नेल विद्यापीठाला ५० दशलक्ष डॉलरची देणगी दिली. ही या विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय देणगी आहे.

असे बनले जेआरडी टाटांचे उत्तराधिकारी

१९७०च्या दशकात रतन टाटा यांना टाटा समूहात व्यवस्थापकीय पद देण्यात आले. नॅशनल रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स (नेल्को) ही उपकंपनी सुरू करून त्यांनी ती उत्तम चालवून दाखविली. त्यानंतर जेआरडी टाटा यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांचे नाव पुढे केले. रतन टाटा यांच्या नेतृत्वात २१ वर्षांच्या कालावधीत टाटा समुहाचा महसूल ४० पटीने व नफा ५० पटीने वाढला. त्यांच्या कार्यकाळात टाटा टी या कंपनीने टेटली, टाटा मोटर्सने जग्वार लँड रोव्हर आणि टाटा स्टीलने कोरस या विख्यात कंपनीची खरेदी केली. 

शिक्षण, ग्रामीण भागाच्या विकासासाठी आग्रही

वयाच्या ७५व्या वर्षी रतन टाटा यांनी २८ डिसेंबर २०१२ रोजी टाटा समूहातील कार्यकारी अधिकार सोडले. सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. टाटा हे शिक्षण, वैद्यकशास्त्रातील प्रगती आणि ग्रामीण भागाचा विकास या गोष्टींसाठी आग्रही होते. २०१४मध्ये टाटा समूहाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई या संस्थेस मोठी देणगी दिली. मर्यादित संसाधनांसह जगणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन आणि अभियांत्रिकी गोष्टी विकसित करण्यासाठी टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाइनची स्थापना केली.

आजीने सांभाळले 

रतन टाटा यांच्या आईचे नाव सूनी टाटा असे होते. सूनी टाटा यांनी काही कारणास्तव दुसरे लग्न केले होते. त्यामुळे रतन टाटा आणि त्यांच्या भावाची देखभाल त्यांची आजी नवाजबाई टाटा यांंनी केले. मोठे होईपर्यंत दोन्ही भावंडांचा सांभाळ केला.

लोकांना केले आवाहन

रतन टाटा यांना भारतरत्न सन्मान दिला जावा, यासाठी देशभरात त्यांच्या चाहत्यांकडून जोरदार अभियान चालवले होते. ‘भारतरत्न फॉर रतन टाटा’ असे या अभियानाचे नाव होते. अखेर अशा प्रकारची मागणी करू नका, असे आवाहन रतन टाटा यांना लोकांना करावे लागले होते.

फोर्ड यांना धडा शिकवला

रतन टाटा यांच्याशी संबंधित आणखी एक रंगतदार किस्सा ९० च्या दशकामधील आहे. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्स कंपनीने टाटा इंडिका ही कार लाँच केली होती. परंतु, रतन टाटांच्या इच्छेप्रमाणे टाटा इंडिका कारचा खप होताना दिसत नव्हता. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने रतन टाटा यांनी अखेर कंपनीचा प्रवासी कारचा विभाग कुणालातरी विकून टाकण्याचा निर्णय घेतला. याबाबत अमेरिकेतील कार निर्माती कंपनी फोर्डशी बोलणी सुरू केली. त्यावेळी फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी टाटांची थट्टा केली होती. बिल फोर्ड टाटांना म्हणाले होते की, प्रवासी कारबाबत कसलीही माहिती नव्हती तर मग प्रवासी गाड्यांचा विभाग सुरूच कशासाठी केला?

बिल एवढे बोलून थांबले नाहीत. ते टाटांना म्हणाले की, तुमचा हा बिझनेस मी खरेदी केला तर हे तुमच्यावर मोठे उपकारच होतील. बिल फोर्ड यांचे हे बोलणे टाटांना चांगलेच लागले. पण, स्वभावानुसार यावर काहीही न बोलता रतन टाटा भारतात परतले. फोर्ड यांच्यासोबतच्या बैठकीनंतर टाटांनी पॅसेंजर कार विभाग विकून टाकण्याचा निर्णय रद्द केला. त्यानंतर ते भारतात ऑटोमोबाइल क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या दिशेने प्रयत्न करू लागले. ठरलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी मनापासून धडपडत राहिले आणि एका दशकापेक्षाही कमी कालावधीत ऑटोमोबाइल क्षेत्रातील बादशहा म्हणून ओळखले जाऊ लागले.

फोर्ड यांनी केलेल्या अपमानाला दशक लोटले होते. या काळात टाटा मोटर्सने नवी शिखरे सर केली. पण, याच काळात फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. हे समजताच टाटा समूहाने फोर्ड कंपनीचा एक ब्राँड खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. यासाठी रतन टाटा आणि बिल फोर्ड यांची बैठक झाली तेव्हा फोर्ड यांची स्थिती अवघडल्यासारखी झाली. त्यावेळी फोर्ड यांनी टाटांना या प्रस्तावासाठी धन्यवाद दिले. ते म्हणाले की, जॅग्वार आणि लँड रोव्हरला खरेदी करून तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार करीत आहात.

अल्झायमरच्या शोधासाठी...

रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखालील टाटा ट्रस्टने अल्झायमर रोगाच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे लवकर निदान आणि उपचार होण्यासाठी विशिष्ट पद्धती विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर न्यूरो सायन्सलाही मोठी देणगी दिली होती.

सन्मान आणि पुरस्कार

रतन टाटा यांना भारत सरकारकडून २००० साली ‘पद्म भूषण’ आणि २००८ मध्ये ‘पद्म विभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरविण्यात आले. राष्ट्रीय नागरी सन्मानासह रतन टाटा यांना महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी २००६ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान देण्यात आला. आसाममध्ये कॅन्सरवरील उपचारांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी २०२१ मध्ये रतन टाटा यांना ‘आसाम वैभव’ सन्मान देण्यात आला.

 

Web Title: ratan tata sad demise know life journey grandma took care inspired the nano from the scooter and taught lesson to ford

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.