अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्योगविश्वासह संपूर्ण भारतीयांच्या मनावर स्वतः च्या आचार-विचारांची छाप सोडणारे प्रसिद्ध उद्योगपती, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना अतिशय भावुक अंत: करणाने निरोप देण्यासाठी हजारो लोक नरीमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या (एनसीपीए) वास्तूत आले होते. ऑक्टोबर हीटच्या उकाड्यातही दिवसभर त्यांच्या दर्शनासाठी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या रांगेत उभे होते. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याची भावनाच या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. अनेकांना तर अश्रू आवरणेही कठीण जात होते.
रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्योगविश्वासह, राजकीय क्षेत्र, कला क्षेत्रातील दिग्गज एनसीपीए येथे आले होते. त्याचबरोबर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच सामान्यांच्याही मोठ्या रांगा लागल्या होत्या. कॉलेज विद्यार्थ्यांपासून, गृहिणी, तरुण-तरुणी, व्यावसायिक, विविध कंपन्या आणि सरकारी कार्यालयांतील अधिकारी, टाटा ग्रुपमधील कर्मचारी हे त्यात होते.
अंत्ययात्रेत जयघोष
टाटा यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होताच नरिमन पॉइंटला अभिवादनासाठी गर्दी झाली होती. मरीन ड्राइव्हला रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक उभे होते. ते टाटांच्या नावाचा जयघोष करीत होते.