काँग्रेस काळात रतन टाटांनाही चौकशीला बोलावलं, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 02:20 PM2023-04-27T14:20:34+5:302023-04-27T14:43:04+5:30
मुंबईत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांची बदललेली भूमिका, राज्यातील राजकीय परिस्थिती आणि केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सध्या राज्यासह देशात चर्चेचा विषय बनला आहे. राज ठाकरे यांनाही ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, त्यावर पुढे काहीच झालं नाही. आता, याच अनुषंगाने लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर २०२३ च्या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंना ईडी-सीबीआय कारवाईसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, राज ठाकरेंनी परखडपणे भूमिका मांडली. यावेळी, काँग्रेस सरकारच्या काळातील एका घटनेचा उल्लेखही राज यांनी केला.
मुंबईत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपलं स्पष्ट आणि परखड मत मांडलं. दरम्यान, याच ईडी आणि सीबीआय कारवाईसंदर्भात अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारला होता. सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारवाईकडे केंद्रीय तपास यंत्रणा का वळत नाहीत? असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी परखडपणे भूमिका मांडताना, सत्तेचा साबण खूप वेगळा असतो, असे राज यांनी म्हटले.
अनेक ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा चुकीच्या पद्धतीने राबवल्या जात आहेत, त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण, अनेक ठिकाणी या खऱ्याही आहेत. कारण, ज्याठिकाणी वर्षानुवर्षे नाले तुंबले आहेत, त्या साफ करायलाच हव्यात. पण, केवळ सत्तेच्या विरुद्ध दिशेलाचा याचा प्रवाह वाहतो, यावरही राज यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
कुणीतरी अगोदर एखादी गोष्ट करुन ठेवायची. मग, पुढचे आल्यानंतर तीच गोष्ट दाम दुप्पटीने केली जाते. मला अजूनही आठवतंय की, काँग्रेसच्या काळात रतन टाटांनाही चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं. आता, रतन टाटांसारख्या व्यक्तीला तुम्ही चौकशीसाठी बोलवता, मग सत्ता बदल झाल्यावर ते उलट थोडसं होणारच आहे. मात्र, सत्तेचा साबण खूप वेगळा असतो, अंगाला काही लागलं की सत्तेजवळ जातात. अंगाला घासून-पुसून घेतात आणि स्वच्छ होतात, असे म्हणत राज ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट केली.
घराणेशाहीच्या मुद्द्यावरही राज ठाकरे बोलले
तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीला राजकारणात आणू शकता. लादू शकत नाही. एका पातळीपर्यंत त्याला पुढे आणू शकता. हे माझं मत मी सांगतो. उद्या तुम्ही अमित ठाकरेंबाबत बोलाल, तर मी अमितला आणू शकतो. एक बाप म्हणून माझं कर्तव्य आहे. मी त्याला आणला तरी मी लोकांवर त्याला लादू शकत नाही. लोकांनी स्वीकारायचं असतं, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.