रतन टाटांची एका मराठी तरुणाच्या स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:39 AM2020-05-08T00:39:56+5:302020-05-08T07:08:13+5:30
अर्जुन देशपांडे याने दोन वर्षांपूर्वी ‘जेनरिक आधार’ची सुरुवात केली होती. सध्या कंपनीचा वार्षिक महसूल ६ कोटी रुपये आहे.
नवी दिल्ली : टाटा उद्योगसमूहाचे पालक रतन टाटा यांनी मुंबईतील १८ वर्षीय तरुण अर्जुन देशपांडे याच्या ‘जेनरिक आधार’ या स्टार्टअप कंपनीमधील ५० टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. अर्जुनची कंपनी जेनरिक औषधी स्वस्तात विकण्याचे काम करते.
अर्जुन देशपांडे याने सांगितले की, सर रतन टाटा यांनी दोन दिवसांपूर्वी ‘जेनरिक आधार’मधील ५० टक्के हिस्सेदारीसाठी गुंतवणूक केली आहे. याची औपचरिक घोषणा लवकरच केली जाईल. सूत्रांनी सांगितले की, रतन टाटा यांनी वैयक्तिक पातळीवर ही गुंतवणूक केली असून, टाटा समूहाशी तिचा संबंध नाही. याआधी टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युअरफीट, अर्बन लॅडर, लेन्स्कार्ट आणि लायब्रेट, अशा अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
अर्जुन देशपांडे याने दोन वर्षांपूर्वी ‘जेनरिक आधार’ची सुरुवात केली होती. सध्या कंपनीचा वार्षिक महसूल ६ कोटी रुपये आहे. त्याची कंपनी थेट उत्पादकांकडून जेनरिक औषधी खरेदी करते आणि किरकोळ विक्रेत्यांना विकते. त्यातून घाऊक विक्रेत्याचे १६ ते २० टक्क्यांचे कमिशन वाचते.