मुंबई - राजधानी मुंबईचापाऊस म्हणजे राज्यात चर्चेचा विषय असतो. दगदग आणि धावपळीच्या मुंबईत पाऊसही मुसळधार कोसळतो. या पावसाने अनेकदा जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय. कित्येकदा लोकल सेवेवरही याचा परिणाम झालाय. मात्र, याच पावसात कुठं वयोवृद्ध आजी-आजोबाला आधार देणारी माणसं दिसतात. तर, कुठं प्राणी मात्रांवर दया दाखवणारी प्रेमळ व्यक्ती दिसतात. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि संवेदनशील उद्योजक रतन टाटा यांनी मुंबईतील पावसाचा असाच एक फोटो शेअर केला आहे.
रतन टाटा हे देशातील नामवंत उद्योजक असून अतिशय संवेदनशील व्यक्तीमत्व आहे. त्यामुळेच, यांच्या नेतृत्वातील टाटा ग्रुप नेहमीच देशावरील संकटावेळी मदतीला धावून येतो. आपल्या कृतीतून ते भावनिकता जपल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय. कोविड काळातही त्यांनी 1500 कोटी रुपयांचा निधी दिला, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आपलं हॉटेल ताज हेही खुलं केलं होतं. रतन टाटा यांनी याच ताज हॉटेलच्या बाहेरील एक फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.