इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील कोरोनावाढीचा वेग कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:07 AM2021-02-08T04:07:05+5:302021-02-08T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविडचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलल्याने दर १० लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलल्याने दर १० लाख लोकांचा विचार केला, तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनावाढीचा वेग किंवा मृत्युदर कमी आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. २ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पाँडिचेरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगढमध्ये १९ हजार ८७७ इतके पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार आठ रुग्ण होते. महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात सहावा होता. सक्रिय रुग्णांबाबत महाराष्ट्रात दर १० लक्ष लोकसंख्येत २९० रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आज आहेत. एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली, तरी दर १० लाख लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत ६४७, गोव्यामध्ये ५२७, पाँडिचेरीत ५२२ आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर १० लक्ष लोकसंख्येचा विचार केला, तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही. कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला, तर ३ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविडचा वाढता दर होता ०.१० टक्के, तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहापट जास्त म्हणजे ०.६१ टक्के आहे. गोवा ०.२, पंजाब ०.१२, गुजरात आणि छत्तीसगढ ०.११ टक्के असा दर होता.
महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांत इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच कितीतरी जास्त आहे. शिवाय, लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. असे असूनही दर १० लक्ष लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण, बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू, याची सांगड घातली तर महाराष्ट्राने उचललेल्या पावलांमुळे कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.