मुंबई महानगरात कार्यालय भाड्याने घेण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:07 AM2021-09-18T04:07:41+5:302021-09-18T04:07:41+5:30
मुंबई : बांधकाम क्षेत्रातील उलाढालीत मुंबई महानगर क्षेत्राचे नाव इतर शहरांच्या तुलनेत नेहमीच आघाडीवर असते. कार्यालय भाड्याने घेण्याच्या बाबतीत ...
मुंबई : बांधकाम क्षेत्रातील उलाढालीत मुंबई महानगर क्षेत्राचे नाव इतर शहरांच्या तुलनेत नेहमीच आघाडीवर असते. कार्यालय भाड्याने घेण्याच्या बाबतीत मुंबई महानगर क्षेत्राला भारतातील इतर शहरांनी मागे टाकले आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कार्यालय भाड्याने घेण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमी झाले आहे. अद्यापही मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर कोरोनाचे सावट कायम असल्याचे दिसून येत आहे. ॲनारॉक संस्थेच्या अहवालानुसार बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांनी कार्यालय भाड्याने देण्याच्या बाबतीत मुंबई महानगर क्षेत्र, दिल्ली एनसीआर व पुणे या शहरांनादेखील मागे टाकले आहे.
बंगळुरू, हैदराबाद व चेन्नई या शहरांमध्ये कार्यालय भाड्याने घेण्याचा एकूण वाटा हा ६६ टक्के एवढा आहे. २०१८ मध्ये ते प्रमाण ४७ टक्के एवढे होते. तर मुंबई महानगर क्षेत्र व पुण्याचा एकूण वाटा २१ टक्के व दिल्ली एनसीआरचा एकूण वाटा ११ टक्के आहे.
याबद्दल ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी सांगतात की आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे भारताच्या दक्षिणेकडील शहरांमध्ये कार्यालय भाड्याने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या शहरांमध्ये कार्यालयांचे भाडे परवडण्यासारखे असल्याने ही मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. उत्पादन व औद्योगिक क्षेत्रात देखील या शहरांमध्ये वाढ होत असल्याने कार्यालयांचे प्रमाण वाढले आहे.