मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असताना वैयक्तिक अपघात विमा काढणा-यांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. मोटार विमा काढणा-यांचा टक्काही घटला असून आगीसारख्या दुर्घटनांसाठी विमा काढण्याचे प्रमाण दोन वर्षांत दुपटीने वाढल्याचे इन्श्युरन्स रेग्युलेटरी अथाँरीटी आँफ इंडियाची (आयआरडीएआय) आकडेवारी सांगते. २०१८ च्या तुलनेत गेल्या वर्षी प्रमियमची रक्कम १४ टक्क्यांनी वाढली होती. यंदा त्यात फक्त ४ टक्क्यांची भर पडली आहे.
एप्रिल ते आँगस्ट, २०१८ या पाच महिन्यांत विविध श्रेणीतल्या विम्याच्या प्रिमियमपोटी विमा कंपन्यांच्या तिजोरीत ६२ हजार ७३२ कोटी रुपयांचा प्रिमियम जमा झाला होता. गेल्या वर्षी तो आकडा ७१ हजार ४०४ कोटींवर गेला. यंदा कोरोनामुळे प्रत्येक जण आर्थिक संकटात असला तरी कंपन्यांकडील प्रिमियमची वसूली ७३ हजार ९६५ कोटींवर झेपावली आहे. सर्वाधिक १६ टक्के घट मोटार विम्यात झाली असून त्याखालोखाल मरिन विम्याचा (१४ टक्के) क्रमांक लागतो. वैयक्तिक अपघात विम्यापोटी गतवर्षी २१०२ कोटी रुपयांचा प्रिमियम विमा कंपन्यांना मिळाला होता. यंदा त्यात ९ टक्के घट होऊन १ हजार ९१९ कोटी रुपये जमा झाले आहेत. आगीसारख्या दुर्घटनांमध्ये विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी २०१८ साली ५ हजार १४७ कोटी रुपये प्रमियम भरून विमा पाँलिसी काढण्यात आल्या होत्या. दोन वर्षांत त्या दुपटीने वाढून १० हजार ३०२ कोटींवर गेल्या आहेत.
२०१८ साली मोटार विम्याचा प्रिमियम २४ हजार ९२६ कोटी असताना आरोग्य विमा १७ हजार २५३ कोटी इतका होता. यंदा मोटार विमा २२ हजार २५४ कोटी इतका कमी झाला असून आरोग्य विमा २२ हजार ९०३ कोटी झाला आहे हे विशेष. कोरोना संक्रमणामुळे आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, या कालावधीत वाहनांचा वापर कमी झाल्यामुळे अपघात आणि मोटार विमा काढण्या-यांची संख्या घटली आहे. आर्थिक परिस्थितीत बदल झाल्यामुळे तूर्त या विम्याच्या संरक्षणाला ग्राहकांनी दुय्यम स्थान दिले आहे.