Join us

महावितरणसह टाटाच्या विद्युत वाहन चार्जिंग केंद्राचे दर प्रतियुनिट ६ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 5:58 AM

मुंबई शहरासह उपनगरात राज्यातील विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्यात येत असून, आजघडीला यामध्ये महावितरण आणि टाटा पॉवर या दोन वीज कंपन्या आघाडीवर आहेत.

- सचिन लुंगसे  मुंबई :महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कंपन्यांच्या विद्युत वाहन चार्जिंग केंद्रावरील वीज दर प्रतियुनिट ६ रुपये एवढा आहे. तर, रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत वाहन चार्जिंग केल्यास वीजदरात १ रुपया ५० पैसे एवढी सवलत देण्यात येत आहे.टाटा पॉवरकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत १२, दिल्लीत ५ तर हैदराबाद येथे २ विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे कार्यान्वित आहेत. मुंबईचा विचार करता माटुंगा, भांडुप (एलबीएसजवळ), चेंबूर, मालाड (न्यू लिंक रोड), कर्नाक बंदर (फ्री वे आणि फोर्टजवळ), वांद्रे-कुर्ला संकुल, बोरीवली (पश्चिम द्रुतगती मार्ग), मानखुर्द (वाशी हायवेवर), आयटीसी ग्रँड सेंट्रल (परळ) येथेही ही केंद्रे आहेत. विक्रोळी, लोअर परळ येथील पॅलेडिअम मॉल, कुर्ला येथीलफिनिक्स मॉल येथेही विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे असून, विक्रोळी येथे सर्वांत प्रथम विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्यात आले आहे.महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावास तत्त्वत:मंजुरी मिळाली आहे.महावितरणकडूनच ही केंद्रे उभारली जातील. पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यातयेईल. मुंबई ४, ठाणे ६, नवी मुंबई ४, पनवेल ४, पुणे १०, मुंबई-पुणे महामार्ग १२ आणि नागपूर येथील १० केंद्रांचा यात समावेश असेल. यासाठीच्यानिविदा अंतिम टप्प्यात आहेत. तर, नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्रात महावितरणने प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारले असून, ते लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.

टॅग्स :महावितरणबातम्या