लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नाट्यनिर्माते व लेखक शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी (दि. २८) रात्री कोरोना संसर्गाने निधन झाले आणि नाट्यसृष्टीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला. नाट्यक्षेत्रात त्यांनी दिलेले योगदानच नव्हे; तर पर्यावरण आणि विकास यांची सांगड घालत उभा केलेला व्यवसाय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मराठी नाट्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या मराठी नाटक समूहाचे ते ज्येष्ठ सल्लागार सदस्य होते. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी नाटक समूहाचा आधारवडच हरपला आहे. या समूहातील काही रंगकर्मींनी शेखर ताम्हाणे यांना वाहिलेली ही आदरांजली...
मराठी नाटक समूहाशी घट्ट ऋणानुबंध
आमच्या मराठी नाटक समूहात येणार का, असे विचारल्यावर फक्त नाटकाबद्दल बोलणार असाल तर मला तुझ्या समूहात सामील करून घे; अशी परवानगी त्यांच्याकडून मिळाली आणि मराठी नाटक समूह व शेखर ताम्हाणे यांचे ऋणानुबंध जुळले. कोणताही उपक्रम सुरू करण्यास तत्पर असणारे ताम्हाणे खर्च करण्यासाठी सढळ हस्ते तयार असायचे. कुठेही मोठेपणा, मानसन्मान त्यांना अपेक्षित नसायचा. एखादा चांगला उपक्रम आर्थिक बाबीमुळे अडता कामा नये, अशी त्यांची भूमिका होती. आमच्या दुसऱ्या प्रायोगिक नाट्यमहोत्सवाच्या जाहिरातींच्या खर्चाचा चेकसुद्धा त्यांनी त्वरित पाठवून दिला होता. नुसते बोलण्यापेक्षा कृतीतून सिद्ध करणारे हे व्यक्तिमत्त्व होते. कोरोनाच्या काळात सगळे घरी बसलेले असतानाच, अनोखी पत्रलेखन स्पर्धा घ्यायची आणि त्याची सर्व रोख रकमेची पारितोषिके आपल्या मदत निधीमध्ये जमा करायची; ही कल्पनाही त्यांचीच होती. मदतनिधी उपक्रमाच्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली, की काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यात कुरापती काढायला सुरुवात केली. तेव्हा सोशल मीडियावर कान ओढायला आणि समूहाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कुठलीही भीड न बाळगता ते व्यक्त होत राहिले.
- आशीर्वाद मराठे (अभिनेता व समूह प्रमुख)
समृद्ध कारकिर्दीचा दुर्दैवी अंत
‘सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’ अशा पहिल्या प्रयोगापासून सुपरहिट झालेली नाटके शेखर ताम्हाणे यांनी दिली. अनेक वर्षांनंतर ‘त्रिकूट’ ही नाट्यसंस्था त्यांनी पुन्हा सुरू केली. आमच्या मराठी नाटक समूहातल्या सर्वच नाट्य चळवळींत त्यांचा सक्रिय पुढाकार असायचा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रंगमंच कामगारांसाठी त्यांनी सधन पुढाकार घेतला. त्याचा परिणाम म्हणून मोठा निधी जमा झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हॅक्सिन घेऊनही ते तापाने आजारी पडले. त्यांची पत्नीही कोविडग्रस्त झाली आणि तिचे निधन झाले; तर शेखर ताम्हाणे व्हेन्टिलेटरवर होते. अनेकांनी प्रार्थना करून, त्यांना जीवदान मिळावे म्हणून देव पाण्यात ठेवले; पण अखेर एका समृद्ध कारकिर्दीचा दुर्दैवी अंत झाला; ही गोष्ट असह्य करणारी आहे.
- पुरुषोत्तम बेर्डे (लेखक-दिग्दर्शक)
एकांकिकांचे क्राफ्टिंग थक्क करणारे
एकांकिकांच्या सुवर्णकाळात एकांकिका लेखक आणि लेखनाला महत्त्व होते. त्यामुळे उत्तम एकांकिका लिहिली नाही, तर तिचे काहीच होणार नाही; हे लेखकाला माहीत असे. त्यामुळे बहुतेक लेखक, स्पर्धेचा विषय आला किंवा निवडला की अस्वस्थ होत. हा विषय कोणत्या लेखकाने, कसा हाताळला असता, मग आपली हाताळणी सर्वस्वी वेगळी कशी असेल, त्यात नावीन्य काय असेल; हे लेखक आधी लक्षात घेई. थोडक्यात, लेखक आपल्या प्रश्नपत्रिकेतून सोपे प्रश्न काढून टाकत असे. विषय स्वतःसाठी कठीण करीत असे. त्यामुळेच उत्तम, माइलस्टोन एकांकिका त्या काळी खूप मोठ्या संख्येने होत. शेखर ताम्हाणे यांची क्रांतिकारकांवरची एकांकिका पाहणे, हा असाच एक अनुभव होता. त्यांचे एकांकिकेचे क्राफ्टिंग थक्क करणारे होते. त्यांची एकांकिका सुरू असतानाच माझ्या तोंडातून दाद निघत होती. एकांकिका संपली आणि आम्ही एकमेकांकडे पाहिले. मी दोन्ही हात जोडले आणि म्हणालो, हेच पाहायला आलो होतो.
- आभास आनंद (लेखक)
* लेखक म्हणून वेगळे व्यक्तिमत्त्व
शेखर ताम्हाणे यांचे ‘तो एक क्षण’ हे नाटक मी स्पर्धेत सादर केले. त्यानिमित्ताने मी त्यांच्यासोबत फोनवर व प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. त्यात दिग्दर्शकीय दृष्टीने जे बदल करावेसे वाटत होते; त्याबद्दल मी त्यांच्याशी बोललो. माझे म्हणणे शांतपणे, पूर्ण ऐकून त्यांनी मला परवानगी दिली. या नाटकाने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. ते माणूस म्हणून तर मोठे होतेच; पण लेखक म्हणून माझ्या मनात त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
- हेमंत भालेकर (लेखक-दिग्दर्शक)
(संकलन : राज चिंचणकर)
................................................