धान्याच्या कुपनसाठी राठोडीत रहिवाशांची झुंबड!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:58 AM2020-04-29T01:58:59+5:302020-04-29T01:59:05+5:30
विभाग क्रमांक ३३ मध्ये वीरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून धान्यवाटप करत आहेत. त्यांचे राठोडीच्या ओमजी कंपाउंडजवळ कार्यालय आहे.
मुंबई : मालाडच्या राठोडी परिसरात सोमवारी धान्याच्या कुपनवरून स्थानिक आणि बाहेरच्या लोकांमध्ये चांगलीच जुंपली. स्थानिक नगरसेवक आझमीनगरच्या लोकांचे कुपन ओमजी कंपाउंडमध्ये वाटत असल्याने हा गोंधळ उडाला असून, जमा झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणताना मालवणी पोलिसांच्याही नाकीनऊ आले. विभाग क्रमांक ३३ मध्ये वीरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून धान्यवाटप करत आहेत. त्यांचे राठोडीच्या ओमजी कंपाउंडजवळ कार्यालय आहे.
या ठिकाणी धान्याची कुपन ते लोकांना देतात. मात्र यात स्थानिकांना वगळून दूर कोसावर असलेल्या आझमीनगरच्या लोकांना बोलावून कुपन देण्यात आल्याचा प्रकार घडत असल्याने सोमवारी स्थानिकांमध्ये याचा भडका उडाला. आम्ही स्थानिक असूनही आम्हाला धान्य न देता लांबच्या विभागात राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी बोलावून कुपनचे वाटप केले जात आहे. त्यामुळे कोरोना या आजाराला चौधरी आमंत्रण देत असल्याचे उघड होत आहे. आम्हाला तुमचे धान्य नको, पण निदान आजार तरी देऊ नका, अशी विनंती स्थानिकांकडून केली जात आहे. चौधरी यांच्या कार्यालयासमोर सोमवारी आझमीनगर व ओमजी कंपाउंडच्या शेकडो लोकांनी गर्दी केली. याची माहिती मालवणी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र भुकेने व्याकूळ झाल्याने अशा नागरिकांना आवरणे यांच्यासाठी जिकिरीचे झाले होते.
राजकारणी लोक धान्यवाटपाच्या नावाखाली गर्दी जमवून पोलिसांचे आयुष्यही धोक्यात आणत असल्याचा खेद मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कालपाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे या लोकप्रतिनिधींनी संकटाचे भान ठेवून तरी जबाबदारीने वागावे, ही विनंती पोलिसांकडून केली जात आहे.
>हा तर कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार
येथून दूरवरच्या विभागात राहणाºया लोकांना या ठिकाणी बोलावून कुपनचे वाटप केले जात आहे. त्यामुळे कोरोना या आजाराला चौधरी आमंत्रण देत असल्याचे उघड होत आहे. आम्हाला तुमचे धान्य नको, पण निदान आजार तरी देऊ नका, अशी विनंती स्थानिकांकडून केली जात आहे. याबाबत कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.