Join us

मुंबई व उपनगरे यांच्यातील वस्तीचे प्रमाण आणि नाते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 5:28 AM

एकंदरीत मुंबईचे बकाल स्वरूप आणि दैन्य वाढते आहे. त्यात भर म्हणून आता फोर्ट आणि नरिमन पॉइंट येथील कार्यालये रिकामी होत आहेत. एअर इंडियाचा महाराजा त्याची शान हरवून बसला आहे. त्यामुळे एअर इंडियाची उत्तुंग इमारतही मोठ्या प्रमाणात रिकामी आहे.

- सुलक्षणा महाजनएकंदरीत मुंबईचे बकाल स्वरूप आणि दैन्य वाढते आहे. त्यात भर म्हणून आता फोर्ट आणि नरिमन पॉइंट येथील कार्यालये रिकामी होत आहेत. एअर इंडियाचा महाराजा त्याची शान हरवून बसला आहे. त्यामुळे एअर इंडियाची उत्तुंग इमारतही मोठ्या प्रमाणात रिकामी आहे.१९६७ साली मुंबई मुख्यत: सात बेटांचे बनलेले शहर अशीच माझी समजूत होती. सर जे.जे. वास्तुकला महाविद्यालय तेव्हाच्या व्ही.टी. स्थानकासमोर होते आणि मरिन ड्राइव्हवरचे मुलींचे वसतिगृह चर्नी रोड स्थानकाजवळ होते. त्यामुळे कॉलेजला जाण्यासाठी बस किंवा पायी चालणे हेच पर्याय होते. काही थोडे विद्यार्थी उपनगरातून येत असले तरी कॉलेजमधील बहुतेक विद्यार्थीही दक्षिण मुंबईमधील असत. मुंबईमधील मोठ्या व्यावसायिक शिक्षण संस्था मुख्यत: याच भागात होत्या. त्यामुळे पाच वर्षांच्या वसतिगृहाच्या वास्तव्य काळांत उपनगरात जाण्याची वेळ क्वचितच आली होती. नंतर पवईच्या आयआयटीमध्ये शिकत असताना तर तेथे जंगलात वस्ती असल्याचा भास होत असे. नंतर मात्र मुंबई आणि उपनगरे यांच्यातील वस्तीचे प्रमाण आणि नाते झपाट्याने बदलू लागले.१९७० सालापर्यंत नरिमन पॉइंटचा फारसा विकास झालेला नव्हता. एअर इंडिया, इंडियन एक्स्प्रेस आणि ओबेराय हॉटेल अशा तीन-चार इमारतीच बांधल्या गेल्या होत्या. बहुतेक सर्व कार्यालयीन रोजगार फोर्ट भागात एकवटले होते. १९५५ साली बांधलेल्या मंत्रालयाची जी इमारत आहे तेव्हा तिचे नाव सचिवालय होते. तेव्हा आज असलेले महाराष्ट्र राज्यही अस्तित्वात आलेले नव्हते. जवळची जीवन बिमाची अर्ध गोलाकार इमारतही साधारण तेव्हाच बांधली गेली होती. त्या काळात विधानसभेचे कामकाज रीगल सिनेमाजवळच्या जुन्या दगडी इमारतीमधून चालत असे. मुंबईची वाढ होऊ नये असे शासकीय धोरण असले तरी १९७०च्या दशकात नरिमन पॉइंट आणि त्यापलीकडील कफ परेड विभागात खूप वेगाने बांधकामे झाली. जागतिक व्यापार केंद्र आणि इतर अनेक बहुमजली कार्यालयीन इमारती तेथे उभा राहिल्या. श्रीमंत लोकांसाठी कफपरेडला आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी मंत्रालयाच्या आसपास उंच इमारती उभ्या राहिल्या तरी मध्यम आणि कनिष्टवर्गीय कर्मचारी यांची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही.एकेकाळी फोर्टमध्ये कार्यालये, जवळचे बंदर आणि बेलार्ड इस्टेट आणि गिरगाव, दादरच्या भागात निवासी इमारती अशी सुस्पष्ट रचना होती. प्रवासाचे अंतर ५-६ कि.मी. होते. पुढे नरिमन पॉइंट गजबजले. मध्यमवर्गीय लोकांना गिरगाव, दादर अपुरे पडू लागले तेव्हा घाटकोपर, चेंबूर, सांताक्रुज, विले-पार्ले, अंधेरी या उपनगरांची वाढ सुरू झाली. लोकांचे प्रवासी अंतर, वेळ आणि गाड्यांची गर्दी वाढली.माझे शिक्षण संपले, नोकरी सुरू झाली. मुंबईच्या पलीकडे ठाणे शहरात वास्तव्याला गेले, तेव्हा मात्र मुलुंड, देवनार, मालाड, बोरीवली अशा उपनगरांचे आणि त्याही पलीकडील विस्तार होत असलेल्या डोंबिवली, मीरा-भायंदर अशा शहरांचे अस्तित्व लक्षात येऊ लागले. लोकलचा प्रवास अनिवार्य झाला आणि मुंबईचे जीवन खºया अर्थाने समजू लागले.उद्योग-व्यवसायांच्या, रोजगारांच्या संधीही आता उपनगरात वाढत आहेत. चाळीस वर्षांपूर्वी मुलुंड-भांडुप, कांदिवली येथे कारखानदारी होती. आज तेथे उत्तुंग कार्यालयीन आणि निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. मुंबईची औद्योगिक ओळख तर पुसून गेली आहे. कार्यालयीन रोजगार वाढले आहेत आणि लोकसंख्येला आवश्यक अशा व्यावसायिक आणि इतर शिक्षण आणि सेवा संस्था शहरभर वाढल्या आहेत. वांद्रा-कुर्ला संकुल हे मुंबई बेट आणि उपनगरे यांची सांधेजोड करणारे संकुल वित्त क्षेत्रातील रोजगारामुळे गजबजते आहे. जवळच सीप्झ विभागात माहिती क्षेत्रातील रोजगार निर्माण झाले आहेत. समुद्रामध्ये भराव घालून, बेट तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून स्मारक करण्याच्या हालचाली आहेत. मुंबईची शान त्यामुळे परत येईल?

टॅग्स :मुंबई