CoronaVirus News in Mumbai: ‘त्या’ शिधावाटप दुकानाचा परवाना झाला रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:42 AM2020-05-01T01:42:37+5:302020-05-01T01:42:43+5:30
शिधावाटप दुकानाविरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर अखेर त्याचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : राठोडीमध्ये शिधावाटप दुकानाविरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर अखेर त्याचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले. बुधवारी याबाबत आॅर्डर काढण्यात आल्याची माहिती कांदिवलीतील ग विभागाच्या उपनियंत्रक शिधावाटप अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळण्याचा मार्ग सुरळीत झाला आहे.
मालाड पश्चिमच्या राठोडी व्हिलेजमध्ये नीलिमा को.आॅप. सोसायटीमध्ये ४२ ग १९४ हे शिधावाटप दुकान होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राठोडीचे शिधावाटप दुकान सतत बंद ठेवणे, कार्डधारकांना धान्य न देणे, फलक दर्शनी भागात नसणे, अन्नधान्याची पावती न देणे, तसेच कार्डधारकांना मोफत मिळणारे तांदूळ देण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार सुरू होते. याबाबत ‘फाइट फॉर राइट’ या संस्थेचे प्रमुख विनोद घोलप तसेच तक्रारदार सुरेश वाघमारे यांनी आवाज उठवला होता. ‘लोकमत’ने ‘राठोडीच्या शिधावाटप दुकानात घोळ’, ‘तुम्ही तुमचं बघा आणि तक्रार मागे घ्या!’ आणि ‘शिधावाटप दुकानाचा परवाना होणार रद्द?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करत सतत या प्रकरणाचा पाठपुरावा केला. परिणामी मुंबई आणि ठाणे विभागाचे सहायक शिधावाटप आयुक्त कैलास पगारे यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी कांदिवलीतील ग परिमंडळ उपनियंत्रक शिधावाटप अधिकारी सुहास शेवाळे यांच्याकडे दिली. शेवाळे यांनी सखोल चौकशी करत दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबित केल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे आता ४२ ग- २९७ या आझमीनगरच्या गेट क्रमांक ७ येथील दुकानातून कार्डधारकांना धान्य देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
>हक्काचे धान्य नाकारणाºयाची गय नाही!
‘लोकमत’ वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने दुकानाची तपासणी करताना दुकानदाराने सुरेश वाघमारे या शिधापत्रिकाधारकाला मोफत तांदूळ न दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मालाड शिधावाटप कार्यालय क्षेत्रातील शिधावाटप दुकान क्रमांक ४२-ग-१९४ चे २९ एप्रिल, २०२०च्या आदेशान्वये प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य नाकारणाºयाची गय न करता कठोर कारवाई केली जाईल.
- सुहास शेवाळे, उपनियंत्रक शिधावाटप, ग परिमंडळ, कांदिवली