रेशन दुकानदार देणार सामूहिक राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:07 AM2017-08-01T03:07:53+5:302017-08-01T03:07:53+5:30
शिधावाटप दुकानदारांना कमिशनऐवजी तामिळनाडू राज्याच्या पार्श्वभूमीवर अनुदान देण्याची मागणी करत, मुंबई रेशन दुकानदार संघटनेने रेशन दुकानदारांचे सामूहिक राजीनामे स्वीकारण्याचे अनोखे आंदोलन
मुंबई : शिधावाटप दुकानदारांना कमिशनऐवजी तामिळनाडू राज्याच्या पार्श्वभूमीवर अनुदान देण्याची मागणी करत, मुंबई रेशन दुकानदार संघटनेने रेशन दुकानदारांचे सामूहिक राजीनामे स्वीकारण्याचे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. १ आॅगस्टपासून मुंबईतील सर्व रेशन दुकानदार त्यांचे राजीनामे संघटनेकडे सुपुर्द करणार असल्याची माहिती अध्यक्ष नवीन मारू यांनी दिली आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील शिधापुरवठा ठप्प होणार असून, बायोमेट्रिक वापरासही विलंब होणार आहे.
तुटपुंज्या कमिशनऐवजी सरकारने थेट शहरी भागात ७० हजार रुपये आणि ग्रामीण भागात ४० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी संघटनेने केल्याचे मारू यांनी सांगितले. मारू म्हणाले की, शिधापुरवठ्यातून दुकानदारांना नफा तर दूरच, पण सर्व खर्च पकडल्यास प्रचंड तोट्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुकानदारांना कमिशनऐवजी सरकारने सर्व खर्च आणि नफ्याच्या बदल्यात अनुदान द्यावे, अशी संघटनेची मागणी आहे.
मुंबईमधील ए, डी, ई व जी विभागातील दुकानदार त्यांचे राजीनामे संघटनेच्या अध्यक्षांकडे जमा करतील. त्यामुळे या विभागातील शिधापुरवठाही बंद होणार आहे. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर सर्व राजीनामे सरकारकडे जमा केले जातील. बायोमेट्रिक मशिनबाबत शिधावाटप दुकानदारांना अद्याप पुरेशी माहिती नाही. त्यामुळे राजीनाम्यानंतर आपोआपच मशिनचा वापरही दुकानदार करणार नसल्याचे मारू यांनी स्पष्ट केले.