गोदाम नादुरुस्तीमुळे रेशनचा पुरवठा अपुरा
By Admin | Published: April 6, 2015 05:19 AM2015-04-06T05:19:54+5:302015-04-06T05:19:54+5:30
रेशनिंग दुकानांवर येणारा धान्यसाठा गोदामांमध्ये साठवला जातो. पण, संबंधित गोदाम नादुरुस्त असल्यामुळे त्यात जास्त धान्यसाठा करणे शक्य नसल्यामुळे
ठाणे: रेशनिंग दुकानांवर येणारा धान्यसाठा गोदामांमध्ये साठवला जातो. पण, संबंधित गोदाम नादुरुस्त असल्यामुळे त्यात जास्त धान्यसाठा करणे शक्य नसल्यामुळे मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना पुरेसा धान्यपुरवठा करणे शक्य नसल्याचे नियोजन समितीच्या बैठकीत नमूद करून संबंधितांनी सोयीस्कररीत्या आपली चूक लपवण्याचा प्रयत्न केला.
दुकानांवरील महागडे अन्नधान्य आदिवासी कुटुंबांना घेणे परवडत नाही. ते अल्पदराचे रेशनिंग दुकानातील धान्य घेऊन उदरनिर्वाह करतात. पण, ते अर्धवट मिळत असल्याची तक्रार श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. इंदवी तुळपुळे यांनी केली होती. पण, काही दिवसांपासून दारिद्रयरेषेवरील कुटुुंबांना धान्यपुरवठा केला जात नाही. केवळ दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना धान्यपुरवठा सुरू आहे. यामुळे धान्य पुरवठा होत नसल्याची तक्रार होती. याशिवाय, धान्यसाठा केला जात असलेली गोदामेदेखील नादुरुस्त असल्यामुळे तेथे जादा धान्यसाठा करणे शक्य नाही.
त्यासाठी गोदाम दुरुस्त करणे गरजेचे असले तरी शासन त्यासाठी निधी देत नसल्याचे प्रशासनातर्फे या वेळी नमूद करण्यात आले. मात्र, जादा धान्यसाठा पुरवण्याच्या दृष्टीने सुयोग्य मार्ग काढणे योग्य असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चर्चेअंती उघड झाले.