दारापुढे गाडी येणार; रेशन देऊन जाणार! ‘शिधारथ’च्या माध्यमातून रेशन नागरिकांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 01:00 PM2023-08-16T13:00:18+5:302023-08-16T13:00:46+5:30
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयातील सूत्रांनी लोकमतला सांगितले.
श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही अभिनव योजना शासनाने मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सुरू केली आहे. त्याअंतर्गत शहरात सात ठिकाणी फिरते शिधावाटप दुकानांना अंतिम मंजुरी देण्यात आली असल्याचे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयातील सूत्रांनी लोकमतला सांगितले.
शहरात कमी भाड्याने लहान दुकान मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिधावाटप दुकानांना जागा नसल्याने नागरिकांना शिधासाठी दुसऱ्या विभागात रेशन दुकानावर जावे लागते. अनेकदा त्यांना प्राधान्यक्रमात रेशनही मिळत नाही. मुंबईत अनेक ठिकाणी शिधावाटप दुकानांची कमतरता असल्याने रेशन कार्डधारकांवर आणि शिधावाटप वितरणात परिणाम होत असतो.
वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात जागेच्या अभावी वा विविध कारणांमुळे दुकान नसते, हे लक्षात घेऊन फिरते शिधावाटप दुकान ‘शिधारथ’ अन्नधान्य वितरणासाठी मुंबईकरांच्या दारी येणार आहे. अशी सात दुकाने असून, ही दुकानांची वाहने कमिशन बेसवर दुकानदार शासनाला पुरविणार आहेत. त्यामुळे वाहन दुकानाचा खर्च शासनाला करावा लागणार नाही. रद्द, निलंबित, जोडलेल्या स्थितीत असणाऱ्या शिधावाटप दुकानांचा फिरते शिधावाटप दुकानांद्वारे पहिल्या टप्प्यात विचार केला जाणार आहे.
सांताक्रुझमध्ये रेशन दुकानच नाही
- उपनगरात सांताक्रुझ येथील इंदिरानगर परिसरात गेल्या आठ वर्षांपासून शासनाचे शिधावाटप दुकान नाही. त्यामुळे येथील नागरिकांना रेशनसाठी दूर जावे लागते.
- अनेकांना रेशनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी रेशन दुकानासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असल्याचे मुंबई रेशन कृतीचे अध्यक्ष रमेश कदम यांनी सांगितले.
चेंबूर, भांडुप, ठाण्यात फिरती दुकाने !
- पहिल्या टप्प्यात सात दुकानांना मान्यता मिळाली आहे. त्यात चेंबूर, भांडुप, वडाळा, वरळी आणि ठाणे आदी भागांचा समावेश आहे.
- त्यापैकी चेंबूर येथे २ दुकाने आणि भांडुप येथे २ अशी चार दुकाने निश्चित असल्याच्या वृत्ताला उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे यांनी दुजोरा दिला आहे.
- तसेच वडाळा, वरळी आणि ठाणे येथे २ दुकानांना मान्यता मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- या सेवेमुळे लाभार्थ्यांना धान्य मिळेल हमखास मिळेल असा विश्वास यानिमित्ताने अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.