मुंबई : रेशनिंग कोटा, कमिशन आणि रेशनिंगसंदर्भात विविध मागण्यांसाठी रेशनिंग दुकानदार लवकरच आझाद मैदानावर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात राज्यभर बैठकांना वेग आला असून, पुण्यातील दुकानदार २० फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने दिली आहे.पुण्यातील मोर्चापासून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असून टप्प्याटप्प्याने सांगली, सोलापूर, सातारासह राज्यभर आंदोलन होणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष पुष्पराज देशमुख यांनी सांगितले. दुकानदारांच्या विविध संघटनांत सुरू असलेल्या बैठकांमध्ये २ किंवा ९ मार्चला आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा आणि धरणे आंदोलनाची तयारी सुरू आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असल्याने लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे महासंघाचे प्रवक्ते नवीन मारू यांनी सांगितले.दुकानदारांनी एक फेब्रुवारीपासून राज्यव्यापी बंदवर जाण्याचा विचार केला होता. मात्र तोडगा काढण्यासाठी महासंघाने एक महिन्याची मुदत दिली होती.त्यानंतरही सरकार आणि दुकानदारांत झालेल्या चर्चेअंती कोणताही तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कार्डधारकांचा बायोमेट्रिकला विरोध : रेशनिंग प्रक्रिया बायोमेट्रिक करून अन्नधान्यातील अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला कार्डधारक संघटनांनी विरोध केला आहे. मुंबई रेशन कार्डधारक अधिकार संघटनेने जुन्याच पद्धतीने पुरवठा करण्याची मागणी केली आहे. गरीब व अशिक्षित लोकांना बायोमेट्रिक यंत्रणा समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे आधी कपात केलेला कोटा सुरू करून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याची मागणी आहे.
रेशनिंग दुकानदार आंदोलनाच्या तयारीत
By admin | Published: February 19, 2015 2:40 AM