Ratnagiri Barsu Refinery: गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप-शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच बारसू रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध करणारे आणि आंदोलकांचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सत्यजित चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. एकीकडे आंदोलक मातीपरीक्षण थांबवून चर्चेसाठी तयार आहेत. तर दुसरीकडे सरकार माती परिक्षण सुरु ठेवून चर्चा करु म्हणत आहे. शरद पवार आणि सत्यजित चव्हाण यांच्या भेटीत बारसू येथे होत असलेली रिफायनरी, आंदोलकांची भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा
बारसू प्रकल्पाचे सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून, पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा करू. आमच्या विकासाचे मॉडेल आमच्याच म्हणण्यानुसार चर्चेत मांडले जाईल, अशी ठाम भूमिका सत्यजित चव्हाण यांनी मांडली होती. कोकणामध्ये विकास करताना पेट्रोकेमिकल झोन तयार करणारे, मानवासह निसर्गाला हानी करणारे प्रकल्प नकोत. यासंदर्भात राज्य सरकारला वारंवार निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिंदे यांनी अद्याप भेट दिलेली नाही. एक रिफायनरी प्रकल्प झाल्यास भविष्यात इतर धोकादायक प्रकल्प उभे राहतील. त्यामुळे प्रदूषणात वाढ होईल, असे सत्यजित चव्हाण यांनी म्हटले होते.
दरम्यान, रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून तेथील पाच गावांतील ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेचे ठराव या प्रकल्पाविरोधात आहेत. माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी चार हजारांहून अधिक ग्रामस्थ बारसू सोलगावच्या सड्यावर उपस्थित आहेत. हे ग्रामस्थ बाहेरून आलेले नसून आजूबाजूच्या गावातील स्थानिक आहेत. रिफायनरीमुळे त्यांच्या गावावर परिणाम होणार असल्याने त्यांनीही विरोध केला आहे, असेही ते म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"