लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकणसह मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असतानाच शनिवारीदेखील कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा या दोन जिल्ह्यांकरिता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते तुरळक जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
२५ जुलै रोजीदेखील कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे. २६ जुलै रोजी पावसाचा जोर ओसरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, या दिवशी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २७ जुलै रोजीदेखील हीच स्थिती राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.