मुंबई : हवामानात झालेल्या बदलामुळे आता बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला देण्यात आलेला पावसाचा इशारा कायम असून, २६ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला नाही.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस कोसळला. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. दि. २७ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातही पावसाची शक्यता आहे. दि. २८ आणि २९ जुलै रोजीदेखील कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील पावसाची शक्यता आहे.