रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोचे आणखी सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लेप्टोच्या रुग्णांची एकूण संख्या ४३ झाली आहे़ जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तत्काळ रुग्णांच्या ७४५ सहवासितांवर प्रतिबंधात्मक उपचार केले आहेत.लेप्टोस्पॉयरोसिस हा रोग बाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गायी, म्हशी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी, माती भाज्या यांच्या ग माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. आरोग्य विभागाकडून लेप्टोबाबत घ्यावयाची काळजी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे.एप्रिलपासून जिल्ह्यात लेप्टोचे शुक्रवारपर्यंत एकूण ३७ रुग्ण होते. त्या सर्व रुग्णांवर औषधोपचार केल्यानंतर बरे झाले आहेत. त्यामध्ये आणखी ६ रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील अरुणा अनिल साळवी (३७) आणि केळ्ये मजगाव येथील रोहिणी रमेश पवार (१८) हे रुग्ण सापडले असून. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये चार रुग्ण आढळून आले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत़ सलीम कादीज माखजनकर (४०, सावर्डे), गंगुबाई बापू शेळके (४०, पेढांबे), अंजली अशोक ठोंबरे (५५, उमरोली) व सुप्रिया सुनिल पवार (३७, ताम्हणमळा), हे रुग्ण सापडले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणाही झाली आहे.शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झालेली असल्यास त्वरीत ड्रेसिंग करुन घ्यावे़ शक्यतो उघड्या पायाने पाण्यामध्ये जाणे टाळावे़ पायामध्ये गमबुट घालावेत़ उंदीर व घुशी यांचा नायनाट करण्यात यावा़, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. तसेच लेप्टोची लक्षणे रुग्णामध्ये आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)
रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोचे एकूण ४३ रुग्ण
By admin | Published: September 11, 2014 10:20 PM