रत्नागिरी ‘मिरकरवाडा’चा देशात लागेल दुसरा क्रमांक

By admin | Published: September 3, 2014 11:15 PM2014-09-03T23:15:45+5:302014-09-04T00:09:49+5:30

उदय सामंत : बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन

Ratnagiri will take Mirakrwada to second place in the country | रत्नागिरी ‘मिरकरवाडा’चा देशात लागेल दुसरा क्रमांक

रत्नागिरी ‘मिरकरवाडा’चा देशात लागेल दुसरा क्रमांक

Next

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराचा दुसरा टप्पा मंजूर झाला असून, त्याचे भूमिपूजनही झाले आहे. अनेक अत्याधुनिक सुविधा मच्छिमारांना उपलब्ध करून देणारे हे बंदर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर ठरणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन आज, मंगळवारी झाले. त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मेरीटाईम बोर्डाच्या अभियंत्यांनी मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्यांत नेमके काय होणार आहे, याबाबतचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखविले.
मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्यांसाठी ७४ कोटी ७० लाखांचे अंदाजपत्रक बनविण्यात आले असून, येत्या तीन वर्षांत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
पूर्ण करावयाचा आहे. टप्पा २ अंतर्गत १६ मीटर लांबीचे ३०० मासेमारी ट्रॉलर्स व २०० पर्ससीन जाळ्यांचे मोठे ट्रॉलर्स सामावून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीबाबत सामंत म्हणाले की, केंद्राच्या २९ आॅक्टोबर २०१२च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे प्रकल्प कार्यान्वयनासाठी काही बाबींची पूर्तता करावयाची होती.
त्यानुसार बंदराची जागा अतिक्रमण विरहित व स्वमालकीची करण्याबाबत पूर्तता झाली आहे. पर्यावरण विषयक प्रमाणपत्रासाठीआवश्यक अहवाल ‘वॉप्कॉस’ या यंत्रणेने आयुक्तांना जून २०१४ मध्ये सादर केलेला आहे. याबाबतची जनसुनावणी २० आॅगस्ट २०१४ रोजी रत्नागिरीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. राज्य शासनाने २५ टक्के निधीची हमी दिली आहे. (प्रतिनिधी)

अशी आहेत वैशिष्ट्ये
पश्चिमेकडील बंधाऱ्याची लांबी १५० मीटरने वाढविणार.
बंदराच्या उत्तरेकडे ६७५ मीटरचा नवीन बंधारा उभारणार.
२ लाख ८७ हजार ६३९ घनमीटर गाळ उपसणार.
६६,०१६ घनमीटर भराव टाकणार.
लिलाव गृह, गियर शेड, जाळी दुरुस्ती व विणकाम शेड उभारणी होणार.
कॉँक्रिटचा उतरता रॅम्प, अंतर्गत रस्ते डांबरीकरण होणार.
नौका दुरुस्ती दुकान होणार.
प्रशासकीय कार्यालय इमारत उभारणार.
विद्युत पुरवठ्यासाठी २५० के.व्ही. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर उभारणार.
उपाहारगृह, रेडिओ संवाद केंद्र उभारणे.
मच्छिमारांसाठी निवारा शेड.
उपाहारगृहात सागरी अन्नपुरवठा.
सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे इटीपी युनिट उभारणे.
अग्निशामक उपकरणे बसविणे.
बर्फ कारखाना, शीतगृह, मासळी प्रक्रिया युनिट, पार्किंग सुविधा, प्रथमोपचार केंद्र सुविधा.
एक लाख लीटर क्षमतेची पाणी साठवण टाकी सुविधा.

Web Title: Ratnagiri will take Mirakrwada to second place in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.