रेल्वे प्लेटफॉर्मवर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचं अनेक घटनांमधून दिसून आलंय. कल्याणमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना एका प्रवाशानं मोबाईलमध्ये कैद केलीय. या व्हिडीओमध्ये रेल्वे स्थानकावर आणण्यात आलेले वडापाव घुशींकडून कुरतडले जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे रेल्वे स्थानकावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
चारमिनार एक्स्प्रेसमध्ये एक चहा विक्रेता चहा आणि कॉफीसाठी टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. यानंतर आता कल्याणमधील व्हिडीओ चर्चेत आलाय. या व्हिडीओत रेल्वे स्थानकावर विक्रीसाठी आणण्यात आलेला वडापावचा क्रेट दिसतोय. या क्रेटकडे वडापाव विक्रेत्याचं जराही लक्ष नाहीय. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील घुशी या क्रेटमध्ये शिरुन वडापाव कुरतडत आहेत. विक्रेता जवळ येताच क्रेटमधून एक घूस बाहेर उडी मारुन पळून जाते. यानंतर विक्रेता क्रेटवरील कापड बाजूला काढतो. तेवढ्यात आणखी एक घूस क्रेटमधून बाहेर पडते. हा संपूर्ण प्रकार विशाल वाघचौरे या तरुणानं त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलाय. या संपूर्ण घटनेमुळे रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.