चाकूच्या धाकात प्रेयसीला दिल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या, ब्रेकअप केल्याच्या रागात प्रियकराचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:01 AM2018-03-27T02:01:35+5:302018-03-27T02:01:35+5:30
नेहाचा नकार कायम होता. याच रागात किसनने बॅगेतून चाकू आणि काही गोळ्या काढल्या.
मनीषा म्हात्रे
मुंबई : ब्रेकअप केल्याच्या रागात २४ वर्षीय प्रियकराने चाकूचा धाक दाखवित, प्रेयसीला उंदीर मारण्याच्या गोळ्या खायला दिल्याची धक्कादायक घटना रविवारी विक्रोळीत घडली. यामध्ये २२ वर्षीय प्रेयसीवर महात्मा फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. किसन सोनावणे असे प्रियकराचे नाव असून, त्याला हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विक्रोळी पूर्वेकडील परिसरात २२ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांंसोबत राहते. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. कांजूर, कर्वेनगर येथील रहिवासी असलेल्या किसन सोनावणे (२४) सोबत तिचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. किसन कामधंदा करत नाही. त्यात किसनच्या संशयी वृत्तीमुळे दोघांमध्ये खटके उडायचे. यातूनच महिनाभरापूर्वी तिने किसनसोबत संबंध तोडले. त्यानंतरही किसन तिचा पाठलाग करत असे, तसेच भररस्त्यात तिला बोलण्यास जबरदस्ती करत होता. यामुळे ती मानसिक तणावाखाली होती.
रविवारी सकाळी १० वाजता किसनने तिला फोन करून, विक्रोळीच्या प्रियदर्शनी उद्यानात भेटण्यास बोलावले. तिने नकार देताच, त्याने घरी येऊन तमाशा करण्याची धमकी दिली. पर्यायी तिने होकार दिला. ठरल्याप्रमाणे ते प्रियदर्शनीमध्ये भेटले. किसनने दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहाचा नकार कायम होता. याच रागात किसनने बॅगेतून चाकू आणि काही गोळ्या काढल्या. चाकूच्या धाकात उंदीर मारण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या. तिने नकार देताच, त्याने चाकू तिच्या गळ्यावर ठेवला. भीतीने नेहाने गोळ्या खाताच, तिला उलट्या सुरू झाल्या. त्याबरोबर, किसनने तेथून पळ काढला. साडेबाराच्या सुमारास बेशुद्धावस्थेतल्या नेहाकडे स्थानिकांचे लक्ष गेले. त्यांनी तिला महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले.
याबाबत रुग्णालयाकडून माहिती मिळताच विक्रोळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी नेहा शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदविला. नेहाने दिलेल्या तक्रारीवरून किसनच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संपदा पाटील यांच्या पथकाने किसनला बेड्या ठोकल्या. तो हत्येच्या उद्देशाने आला असल्याची माहिती त्याच्या चौकशीत उघड झाली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.