मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही ते उपरोधात्क टिका करत आहेत. या देशात जो प्रकाश पडलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच. मोदी हेच सूर्य, मोदी हेच चंद्र, धुमकेतूही मोदीच आहेत. शीतल चांदणे मोदींमुळेच पडते. नद्यांचे वाहणे, समुद्राचा खळखळाटही मोदींमुळेच होतो, माझा श्वास चालतो, तोदेखील मोदींमुळेच, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतांनी केलेल्या या टिकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांना टोला लगावला आहे.
भाजप नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही. तुरुंगात जावे लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावर होत नाही, असेही पाटील यांनी म्हटले. तर, फडणवीस यांनीही तसाच पलटवार संजय राऊत यांच्यावर केला आहे. तसेच, राऊत यांना बाजारबुणगे म्हणत प्रहारही केलाय.
अलीकडच्या काळात बाजारबुणगेही पंतप्रधान मोदींवर बोलतात. त्या बाजारबुणग्यांना सांगतो, अरे वेड्यांनो सुर्याकडे पाहून थुंकाल तर ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल. या बाजारबुणग्यांना राऊत,फाऊद, दाऊद यांना सांगून देतो, मोदींकडे तोंड करुन थुंकण्याचा प्रयत्न करू नका, ती थुंकी तुमच्याच चेहऱ्यावर पडतेय. आणि तो थुंकीने लगबगलेला चेहरा पाहण्याची इच्छा कोणाचीही नाही, असे म्हणत फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. सावरकर गौरव यात्रेतील भाषणात फडणवीसांनी हा निशाणा साधला.