मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना संजय राऊत यांच्याऐवजी एस. रहाटे आणि एकनाथ खडसेंऐवजी खडासने असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच दोघांनाही समाजविघातक असल्याचे दाखवत हे फोन टॅप करण्यात आले. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींसह त्यांच्याशी संबंधितांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. यात संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय टेलिग्राफ कायदा व भादंवि कलमांन्वये गुन्हा दाखल करून कुलाबा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी शुक्लापाठोपाठ राऊत आणि खडसे यांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांचाही फोन टॅप करण्यात आला होता. ६७ दिवस खडसे यांचा फोन टॅप झाल्याची माहिती समोर आली.
सहा जणांचे जबाब नोंदखडसे यांच्यासोबतच त्यांच्या स्वीय सहायक आणि एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप करण्यात आल्याचे समजते, तर संजय राऊत यांचा तब्बल ६० दिवस फोन टॅप करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. यामध्ये बोगस नावांचा वापर करण्यात आला होता.