सेनेतून राऊतांनाच संधी, तर आघाडीत अंतर्गत रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:37 AM2019-08-29T01:37:10+5:302019-08-29T01:37:14+5:30
मनीषा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रात, कामगारांचे ...
मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रात, कामगारांचे प्रश्न, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकासाबरोबरच येथील कांजूर ड़म्पिंग ग्राऊण्डच्या मुद्यावर यंदाची विधानसभा निवडणूक रंगणार आहे. त्यात, सेनेकडून आमदार सुनील राऊत यांनाच संधी असल्याने, अन्य इच्छुकांनी काढता पाय घेतला. तर, कॉंग्रेसमधून संदेश म्हात्रे तर राष्ट्रवादीतून धनंजय पिसाळ इच्छुकांमध्ये रिंगणात आहे.
नाहूरपासून विक्रोळीपर्यंत विस्तारलेला विक्रोळी विधानसभा मतदारसंघ. नाहूर,भांडूप, कांजूर आणि विक्रोळी हा सर्व परिसर या मतदारसंघात येतो. भांडूपसह विक्रोळी हा सेनेचा गड मानला जातो. २००९ मध्ये मनसे लाटेत आमदार मंगेश सांगळे यांनी, सेनेचे दत्ता दळवी तसेच माजी खासदार संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा पराजय करत, दुप्पट मतांनी विजय मिळवला. २०१४च्या लोकसभा निवडणूकीत विक्रोळीतून सोमय्या यांना ७४ हजार ९९ मते पडली होती. तर संजय पाटील यांना ३२ हजार ८८७ मतांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी सेनेचे पदाधिकारी सोबत होते. त्यात मोदी लाट यामुळे सोमय्यांच्या मतात वाढ झाली.
२०१४ मध्ये खासदारकी हरल्यानंतर, संजय पाटील हे आमदारकी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून विक्रोळी विधानसभेसाठी स्वत: रिंगणात उतरले. मात्र, सेनेच्या राऊत यांनी त्यांचा तब्बल ३२ हजार ९०२ मतांनी पराजय केला होता. पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर पोहचले होते. मनसेचे सांगळे २४ हजार ९६३ मतांनी दुस-या क्रमांकावर होते.
यंदाही सेनेकडून राऊतांनाच संधी मिळत असल्याने, इच्छुकांनी काढता पाय घेतला आहे. याच विभागातून लढण्यासाठी माजी महापौर दत्ता दळवीही तयारीत होते. मात्र, आता राऊतांनाच उमेदवारी मिळत असल्याने, आपण उमेदवारीसाठी पुढाकार घेणार नसल्याचे दळवींनी सांगितले. तर, कॉंग्रेस आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र यावर उमेदवारी ठरणार आहे. यात, कॉंग्रेस कडून संदेश म्हात्रे आणि राष्ट्रवादीकडून धनंजय पिसाळ यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केला आहे. दोघेही कामाला लागले आहेत.
’विद्यमान आमदारांनी हवे तसे काम केले नाही. नको तिथे पैसे खर्च केले. विक्रोळीच्या विकासासाठी मी देखील कामाला सुरुवात केल्याचे म्हात्रेंनी सांगितले. म्हात्रे यांना २०१४ च्या निवडणूकीत १८ हजार ४६ मते पडल्याने ते चौथ्या क्रमांकावर होते.
तर’नागरिकांनी ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले. पुढे आघाडीकडून राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला येथून जागा मिळणार हे देखील निश्चित आहे. त्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून मी कामाला लागलो असल्याचे धनंजय पिसाळ यांनी सांगितले.
मनसेच्या उमेदवारीवर निवडून आलेले मंगेश सांगळेने भाजप प्रवेश केला. त्यानंतर, त्यांच्याविरुद्ध लागलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर नानाविध चर्चा रंगल्या. मात्र पुढे, ते प्रकरण निवळले. मात्र ते देखील युती न झाल्यास भाजपकडून उमेदवारीसाठी सज्ज आहेत. मनसेला उमेदवारीसाठी चेहरा नाही. तर, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. लोकसभेला या मतदार संघातून वंचितच्या उमेदवाराला १२,२६८ मते पडली होती. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण असणार? यावर येथील मतांचे विभाजन ठरणार आहे. (उद्याच्या अंकात - विलेपार्ले मतदार संघ)