Join us

रावढळकरांना दरडींचा धोका

By admin | Published: September 12, 2014 11:55 PM

महाड तालुक्यातील रावढळ, गोठे खुर्द, गोठे बुद्रुक, कोसबी, बुद्धवाडी या गावांजवळ डोंगरातून बेकायदेशीर मातीचे प्रचंड उत्खनन करण्यात येत आहे

महाड : महाड तालुक्यातील रावढळ, गोठे खुर्द, गोठे बुद्रुक, कोसबी, बुद्धवाडी या गावांजवळ डोंगरातून बेकायदेशीर मातीचे प्रचंड उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे मुसळधार पावसाने मातीचे भराव खाली येण्यास सुरुवात झाल्यामुळे रावढळ, गोठे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील महसूल विभागाला वारंवार कळवूनही कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे बेकायदेशीर उत्खनन थांबविण्यात यावे, तसेच विनापरवाना उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गोठे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील जाधव यांनी दिला आहे.महाड तालुक्यातील रावढळ, गोठे खुर्द, गोठे बुद्रुक, कोसबी, बुद्धवाडीसह सुमारे सातपेक्षा अधिक वाड्यांमध्ये राहत असलेले ग्रामस्थ जीव मुठीत घेवून जगत आहेत. गोठे आणि रावढळ गावाच्या हद्दीत कोसबीच्या डोंगर माथ्यावर मातीचे प्रचंड उत्खनन गेल्या एक वर्षापासून केले जात आहे. गेल्या वर्षी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली. यानंतर पुन्हा उत्खनन करण्यात आले. रावढळ गावाजवळून जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गाला देखील दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असल्याचे सरपंच सुनील जाधव यांनी सांगितले. स्थानिक महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने बेकायदेशीर उत्खनन दिवस-रात्र होत असताना महसूल खात्याचा एकही अधिकारी या परिसरामध्ये फिरकत नसल्याबद्दल स्थानिक रहिवासी उघडपणे आरोप करीत आहेत. रावढळ गावापासून काही अंतरावर असलेल्या जुई, रोहणजवळ असलेल्या डोंगरातील प्रचंड मातीचा भराव गावावर कोसळल्याने प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली. त्याची पुन्हा पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचे सुनील जाधव यांनी सांगितले. डोंगराच्या माथ्यावर असलेल्या सपाट जमिनीवर हैद्राबाद येथील ठेकेदाराने हिल स्टेशन प्रकल्प उभारण्याचे काम सुरु केले आहे. पठाराकडे जाण्यासाठी डोंगरातून रस्ता तयार करताना कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसर दरडग्रस्त असून २००५ मध्ये प्रचंड भराव कोसळून म्हाप्रळ मार्गावरील सर्व गावे मातीच्या ढिगाऱ्याने व्यापली होती. सुदैवाने या गावांमध्ये जीवित हानी झाली नाही. परंतु वित्तहानी झाल्याची माहिती जाधव यांनी दिली. (वार्ताहर)