Join us  

रवीना टंडनच्या घराबाहेर नेमकं काय घडलं? मुंबई पोलिसांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 10:40 PM

रवीना टंडनच्या व्हायरल व्हिडिओनंतर आता या प्रकरणाशी संबंधित सत्य बाहेर आले आहे.

अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रवीना टंडनवर एका वृद्ध महिलेसह इतर दोन महिलांवर गाडी चढवत मारहाण केल्याचा आरोप आहे. अभिनेत्री रवीना टंडन ही दारूच्या नशेत होती, असा दावा देखील करण्यात आला होता. तसेच रवीना टंडनच्या कार चालकाने तिन्ही महिलांवर धावून जाऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला होता. चालकाने मला इतके मारले की रक्तस्त्राव सुरू झाला, अशी तक्रार एका महिलेने केली होती. यानंतर रवीनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता रवीनाच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळं सत्य समोर आलं आहे.

रविवारी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रवीना टंडनवर जमावाने हल्ला केला होता. हा व्हिडिओ १ जूनचा आहे. ज्यामध्ये लोकांची गर्दी एकाच वेळी रवीनावर ओरडताना आणि धावताना दिसत आहे. रवीनाच्या ड्रायव्हरने तीन जणांना जखमी केल्याचा आरोप केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र व्हिडीओमध्ये रवीनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दिसत आहे. मात्र आता मुंबई पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

व्हिडीओमध्ये रवीनाच्या ड्रायव्हरवर कारने एकाच कुटुंबातील तीन जणांना जखमी केल्याचा आरोप आहे. याच कुटुंबाने रवीना टंडनवर दारू पिऊन महिलेला मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. व्हिडीओमध्ये रवीना गर्दीला कोणालाही इजा न करण्याची विनंती करत होती. व्हिडिओमध्ये रवीना पुन्हा पुन्हा माझ्या चालकाने काहीच नाही केले असे म्हणत होती. मात्र संतप्त जमाव रवीनावर हल्ला करताना दिसत होता. मात्र रवीना ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्न करत होती.

"मी आणि माझे कुटुंबिय काही कामावरून परतत होतो. आम्ही रवीना टंडनच्या घराजवळून येत होता. त्याचवेळी रवीना जींच्या ड्रायव्हरने माझ्या आईवर गाडी चालवली. त्याला तू काय करतोस असे विचारल्यावर तो गाडीतून खाली उतरला. त्याने माझ्या भाचीला खूप मारले. आईलाही खूप मारलं. त्यानंतर रवीना टंडनही घराबाहेर पडली. त्यांनी माझ्या आईलाही मारलं. भाचीला मारा. ती दारूच्या नशेत होती. माझ्या आईचे संपूर्ण डोके फुटले, अशी तक्रार मोहम्मद नावाच्या व्यक्तीने केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीनाचा ड्रायव्हर तिची गाडी उभी करण्यासाठी रिव्हर्स करत होता. त्यावेळी दुसरा पक्ष तिथून जात होता जो चालकावर ओरडायला लागला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोणालाही दुखापत झाली नाही किंवा कोणाच्या डोक्याला मार लागलेला नाही. "टंडनचा ड्रायव्हर गाडी उभी करण्यासाठी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करत असताना एका कुटुंबातील तीन जणांना धडक बसेल असे वाटले. वादानंतर दोन्ही पक्ष निघून गेले आणि नंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून टंडन यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. दुसऱ्या पक्षालाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. दोन्ही पक्षांनी तक्रार देण्यास नकार दिला," अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 

दरम्यान, या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये रवीनाचा ड्रायव्हर हळू गाडी चालवताना दिसत आहे. गाडी तिथे उपस्थित असलेल्या महिलांना धडकतही नाही.

टॅग्स :मुंबई पोलीसरवीना टंडनसोशल व्हायरल