अनिकेत घमंडी, डोंबिवलीयेथील फडके रोडवरील एका प्रसिद्ध ज्वेलर्सला कुख्यात रवी पुजारीकडून धमक्या आल्याने ऐन दिवाळीत व्यापारीवर्गात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या वर्षी आॅगस्ट महिन्यापर्यंत डोंबिवलीत पुजारी गँगच्या धमक्या आल्याच्या तक्रारी ठाणे सायबर क्राइमसह ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात धमक्यांची मालिका काही अंशी कमी झाली असताना आता अचानक फडके रोडवरील एका ज्वेलर्सला धमकीचा फोन आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या ज्वेलर्सच्या दुकानातील मोबाइलवर हा फोन आला, परंतु त्यात रेकॉर्डिंगची सुविधा नसल्याने ते संभाषण पोलिसांना मिळू शकले नाही. ज्या फोनवरून धमकी देण्यात आली तो क्रमांक परदेशातला असल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले असले तरीही नेमका फोन कुठून आला, ते मात्र स्पष्ट झाले नाही. त्या वेळी झालेल्या संभाषणात मी रवी पुजारी बोलत असून ‘आमचे काहीतरी बघा’ असे सांगण्यात आले. तसेच आणखी एक क्रमांक देण्यात आला. त्या फोनवर फोन करा किंवा त्यावरून फोन येईल, असे सांगत पुन्हा आमचे काहीतरी करा, अशा आशयाचे संभाषण झाल्याची माहिती त्या ज्वेलर्सने पोलिसांना आपल्या तक्रारीत दिली. याबाबत तक्रार नोंदवून ठाण्याच्या सायबर क्राइम शाखेकडे मोबाइल फोनची माहिती शोधून काढण्याचे काम सोपवले आहे. यापूर्वी ज्या व्यावसायिकांना असे धमक्यांचे फोन आले, त्यांच्या फोनमधील संभाषण पोलीस पडताळून पाहात असून, त्यामधील आवाज एकाच व्यक्तीचा आहे व रवी पुजारी याचाच आहे का याची खातरजमा केली असता, तो आवाज पुजारीचाच असल्याला पुष्टी मिळाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ज्वेलर्सला खंडणीकरिता रवी पुजारीच्या धमक्या, व्यापाऱ्यांत घबराट
By admin | Published: November 09, 2015 3:09 AM