रवी पुजारी टोळीच्या हवाला आॅपरेटरला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:02 AM2017-11-30T05:02:27+5:302017-11-30T05:03:30+5:30
गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या हवाला आॅपरेटरला बुधवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. रमेश अलाईद उर्फ दिलीप जीवनराव इस्त्रानी (७२) असे आरोपीचे नाव आहे.
मुंबई : गँगस्टर रवी पुजारी टोळीच्या हवाला आॅपरेटरला बुधवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. रमेश अलाईद उर्फ दिलीप जीवनराव इस्त्रानी (७२) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो हवालामार्गे पुजारी टोळीला पैसे पुरवत होता.
मालाड एसआरए प्रकरणात पात्र-अपात्रांमध्ये मध्यस्थी करणाºया कांदिवलीच्या बांधकाम सल्लागार कंपनीला रवी पुजारीच्या टोळीने धमकावले. रवी पुजारीचा हस्तक विक्रांत वरदाने याने या कंपनीच्या अधिकाºयाला जुहू येथे बोलावून त्यांना प्रकरणातून मागे हटण्याचा सल्ला दिला. कंपनीने गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने १० आॅक्टोबर रोजी विक्रांत वरदानेसह दशरथ शिंदे उर्फ विजय, सुनील जाधव उर्फ दया या तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून १३ नोव्हेंबरला पुजारी टोळीच्या करणसिंग राजपुतलाही बेड्या ठोकण्यात आल्या.
राजपुतच्या चौकशीत घाटकोपरमधील हवाला आॅपरेटरचे बिंगही फुटले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी घाटकोपरमधून ७२ वर्षांच्या इस्त्रानीला बेड्या ठोकल्या. त्याचे काळबादेवी परिसरात कार्यालय आहे. विकासकाकडून पैसे उकळून तो हे पैसे हवालामार्गे रवी पुजारी टोळीला पुरवत होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो हा कारभार करत होता. त्याच्याकडून ७ लाखांची रोकड, ५ मोबाइल जप्त करण्यात आले. बुधवारी मोक्का न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.