रवी पुजारीला आज मुंबईत आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:09 AM2021-02-23T04:09:46+5:302021-02-23T04:09:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला आज मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबईत त्याच्याविरुद्ध ३०हून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला आज मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबईत त्याच्याविरुद्ध ३०हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पुढील तपास करणाऱ आहेत.
पुजारीविरुद्ध मुंबईसह कर्नाटक, बंगळुरू, मंगळुरू आणि गुजरात अशा विविध ठिकाणी दीडशेहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने स्वतंत्र टोळी करत व्यावसायिक, चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक व्यक्तींना खंडणीसाठी धमकावले आहे. गोळीबार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तो परदेशातून सर्व सूत्रे हलवत होता.
दोन वर्षांपूर्वी कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे सेनेगलमध्ये तो पकडला गेला. मात्र खोटी ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करत पुजारीने भारतातील संभाव्य प्रत्यार्पण रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि कर्नाटक पोलिसांनी अथक प्रयत्न करून तो रवी पुजारीच असल्याचे सिद्ध केले आणि भारतात त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या दीडशेहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्ह्याची कुंडली त्यांच्यासमोर मांडली. त्यामुळे पुजारीचे भारतात प्रत्यार्पण झाले. तेव्हापासून तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात होता.
मुंबईत दाखल असलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यात पुजारीचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला विलेपार्ले येथे गझाली हॉटेलमध्ये २०१६ साली झालेल्या गोळीबारप्रकरणी पुजारीचा ताबा मिळाला आहे. शनिवारी बंगळुरू न्यायालयाने गुन्हे शाखेस परवानगी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक बंगळुरूला रवाना झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे.
....