Vidhan Parishad Election 2022: “योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार, येत्या २ महिन्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार”; रवी राणांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:52 PM2022-06-20T23:52:45+5:302022-06-21T10:17:15+5:30
Vidhan Parishad Election 2022: आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणला जाईल, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.
मुंबई: राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूकही (Vidhan Parishad Election 2022) अत्यंत चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचा उमेदवार विजयी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपचे पाचवे उमेदवार असलेले प्रसाद लाड विजयी झाले आणि एकच जल्लोष करण्यात आला. शिवसेनेचे दोन, राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन तर भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून, चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार असून, येत्या २ महिन्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे.
आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणला जाईल. शिवसेना आणि काँग्रेसची मते फुटल्याचे समोर आले. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार व्हावे, यासाठी योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले. तसेच बजरंगबलीचा आशिर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. रावणाची लंका जाळण्यासाठी राम भक्त आणि हनुमान भक्त आमदारांच्या रुपात मैदानात उतरले आहेत. आधी आमदार त्यांना धडा शिकवतील आणि मग जनता त्यांना धडा शिकवेल, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले.
ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू झाली
हनुमान आणि श्रीरामांची कृपा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजरंगबलींची अपमान केला. हनुमान चालिसा पठणावरून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आले. राज्यसभा निवडणुकीच्या निकालावेळीही सांगितले होते की, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू झाली. याची सुरुवात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निकालावरून झाली आहे. पुढील दोन महिन्यात मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे पायउतार होतील आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असा मोठा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रवीण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना ३०, उमा खापरे यांना २७ आणि प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली असून, सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.