Ravi Rana: आमदार राणांवरील 307 च्या गुन्ह्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 03:02 PM2022-03-07T15:02:19+5:302022-03-07T15:04:25+5:30
Ravi Rana: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लावण्यात आला होता हे खरे,
मुंबई – अमरावतीमधील शाईफेक प्रकरण विधानसभा सभागृहात चांगलेच गाजले. आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला. त्यावरून भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एखादा आमदार दिल्ली असताना त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. महाराष्ट्रात असं होणं दुर्देव आहे. एखाद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काय गुन्हा केला तर अजितदादांना फासावर चढवणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत विचारला. तर, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याच्या दबावामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला. त्यावर, गृहमंत्र्यानी स्पष्टीकरण देत आरोप फेटाळले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लावण्यात आला होता हे खरे, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तो हटविण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांची मदत मागितली. या घटनेनंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच, या घटनेच्या वेळी आपण दिल्लीत होतो, असे राणा यांनी सांगितले, आम्ही त्याची चौकशी करू. मी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सूचना दिल्या किंवा कोणावरही दबाव आणला नाही, असेही गृहमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना स्पष्ट केले. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात एडीजी आणि उच्च अधिकाऱ्यांशी बोलू. तसेच, मुख्यमंत्र्यांशीही या घटनेबाबत चर्चा करू, असे गृहमंत्र्यांनी विधानसभेत उत्तरादाखल बोलताना म्हटले.
आमदार रवी राणा काय म्हणाले
फडणवीसांनंतर आमदार रवी राणा(MLA Ravi Rana) यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली. तेव्हा रवी राणा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्या संगतमताने छन्नी हातोड्याने काढून तो पुतळा गोदाऊनमध्ये टाकला असेल तर त्यावर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. संतप्त शिवभक्तांनी मनपा आयुक्तांवर शाईफेक केली त्याचा निषेध करतो. परंतु त्यावेळी मी दिल्लीत असताना माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारमधील प्रमुख लोकांच्या दबावाखाली माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकण्यात आला. रात्री दीडच्या सुमारास माझ्या घरी १००-१५० पोलीस घुसून माझ्या घरच्यांना त्रास दिला असं त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप
गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचा फोन पोलीस आयुक्तांना गेला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आर आर पाटीलसारखे गृहमंत्री राज्याला हवेत. सचिन वाझेसारखे पोलीस अधिकारी राज्य निर्माण करत असतील तर तुमचाही अनिल देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याविरोधात ३०७,३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांवर इतका दबाव टाकला की रवी राणा जिथं दिसेल त्याला गोळी मारा असं सांगण्यात आले. जर मी खोटे बोलत असेन तर मला फाशी द्या, मी विधानसभेत फाशी घेईन यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
पोलीस बेछूट होतील - फडणवीस
अमरावतीत जो काही प्रकार घडला त्यावरून दिल्लीत असलेल्या आमदारावर ३०७ चा गुन्हा कोणाच्या दबावाखाली लावण्यात आला? बेकायदेशीरपणे ३०७ चा गुन्हा ज्यांनी लावला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. जर पोलीस बेछूट झाले तर या राज्यात कायदा कुठेच उरणार नाही. त्यामुळे रवी राणा यांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.