मुंबई - खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून शिवसैनिक संतप्त झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांकडूननीत राणा यांच्या विरोधात बंटी बबलीच्या घोषणा देण्यात येत आहेत. महिला शिवसैनिकांचीही मोठी गर्दी याठिकाणी जमली असून राणा दाम्पत्यांविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत. राणा दाम्पत्याला थेट इशारा दिला आहे. तुम्ही घराबाहेर येऊन दाखवा. महाप्रसाद सोबतच आणला आहे. जोपर्यंत राणा दाम्पत्य माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. माफी मागा अन्यथा घरात घुसू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच राणा दाम्पत्य यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे. यामध्ये सुरुवातीला राणा दाम्पत्य पूजा करताना दिसत होते. त्यानंतर रवी राणा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच "'मातोश्री' हे आमच्यासाठीही देऊळ आहे. आम्ही देखील मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचण्यासाठी निघालोय. पण आम्हाला थांबवलं आणि गुंडागर्दी करून आमच्या घरावर हल्ला होत आहे. पोलिसांना हाताशी धरून मुख्यमंत्री कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत" असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
"आम्हाला दरवाजामध्ये रोखलेलं आहे. हनुमानाचं नाव घेण्यापासून आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आम्ही इथून बाहेर पडणार आहोत आणि याची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील. मातोश्रीवर कार्यकर्त्यांना बोलावून आमच्या घरावर हल्ला करायचा, आम्हाला रोखायचं, आम्हाला मारायचं, गाड्यांची तोडफोड करायची असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र कुठे चाललाय हे महाराष्ट्राची जनता पाहतेय" असं म्हणत रवी राणा यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला लागलेला हा शनी आजच्या दिवशी संपवायचा आहे. शिवसैनिकांकडून गुंडगिरी सुरू आहे. आमच्या घरावर हल्ला होतो आहे, तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच असे आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले. हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्र कुठे चालला आहे. महाराष्ट्राच्या सुख शांततेसाठी आम्ही जात आहोत. आम्हाला कोणी रोखू नये असे आवाहन रवी राणा यांनी केले.
शिवसैनिक आमच्या दारापर्यंत येऊन उभे राहिले आहेत. हा गुंडगिरीचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसैनिकांना माझ्या घरावर हल्ला करण्यास सांगितले. तेच कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत, असा आरोप रवी राणा यांनी केला. या व्हिडीओमध्ये आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे की, "हनुमान आणि प्रभु रामचंद्र यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी... ज्या पद्धतीने शेतकरी, शेतमजूर आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला लागलेली शनि, या शनिवारच्या दिवशी, मातोश्री आमचं ह्रदयस्थान आहे. बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे. त्याठिकाणी जाऊन हनुमान चालीसा वाचणार आहे."