Join us

निलेश राणेंच्या नाराजीचं कारण अखेर समोर; देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:16 PM

निलेश राणेंचे हे म्हणणं अतिशय रास्त होते. या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सर्वांनी अतिशय गांभीर्याने विचार करू असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

मुंबई – माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि कोकणातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आले. निलेश राणेंच्या या भूमिकेनंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले गेले. मात्र निलेश राणेंची मनधरणी करण्यात भाजपाला यश आले. आज सकाळी रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणेंची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले. त्याठिकाणी झालेल्या २ तासांच्या बैठकीत निलेश राणेंच्या नाराजीचं कारण अखेर समोर आले. यावर बैठकीत तोडगा काढून पुढील काळात कोकणात निलेश राणेंच्या नेतृत्वात भाजपाचा झंझावात सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.

फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, खरेतर निलेश राणेंनी ट्विट केल्यानंतर आमच्यासारख्या प्रत्येकाला सर्व गोष्टींबद्दल नक्की काय घडलं हे कळत नव्हते. परंतु त्यानंतर आम्ही नारायण राणेंशी चर्चा केली, नारायण राणेंनीही निलेश राणेंशी बोलत काय घडलंय याची चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी मी प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली. देवेंद्र फडणवीसदेखील या विषयावर निलेश राणेंशी बोलले, एक गोष्ट लक्षात आली काहीतरी घडलं होतं त्यामुळे हे झालं. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी निलेश राणेंनी भूमिका घेतली होती. जेव्हा छोटा कार्यकर्ता काम करत असतो, त्यावेळी त्याला येणाऱ्या अडचणी नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत असं निलेश राणेंची मागणी होती असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत निलेश राणेंचे हे म्हणणं अतिशय रास्त होते. या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सर्वांनी अतिशय गांभीर्याने विचार करू. कुठल्याही निवडणुकीत नेतेमंडळी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करतो. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यासुद्धा नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. या भावना जाणून न घेतल्यानं निलेश राणे नाराज होते. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहचत नाहीत यादृष्टीने त्यांनी रागावून का होईना हा निर्णय घेतला. परंतु मी, नारायण राणे, नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वजण लक्ष घालू असं आश्वासित केले आहे अशी माहिती मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली.

दरम्यान, चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामातून बाहेर जाणे हे पक्ष संघटनेला परवडणारं नाही. म्हणून मी स्वत: फार आग्रह केला की असं करू नका. यानंतरच्या काळात असं काही होणार नाही. तुम्ही आम्ही छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊ आणि यादिशेने वाटचाल करू. देवेंद्र फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली. डॉ. निलेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच कोकणातील सर्व भागात जो त्यांचा झंझावात येणाऱ्या काळात सुरु राहील. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते पक्ष संघटनेसाठी अतिशय जोमाने काम करतो. कार्यकर्त्यांच्या जीवावर सगळी मदार असते. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमची तयारी सुरू असते. परंतु ग्रामपंचायतीतील कार्यकर्त्यांचीही अडचण समजून घेणे हे अत्यंत गरजेचे असते. प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात अशी निलेश राणेंनी रास्त मागणी होती. निलेश राणेंची नाराजी स्वाभाविक होती. यानंतरच्या काळात असं काही घडणार नाही अशी खात्री आम्ही दिली आहे असंही रवींद्र चव्हाण म्हणाले. यावेळी निलेश राणेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

टॅग्स :निलेश राणे देवेंद्र फडणवीसभाजपा