ऑगस्टनंतर उघडणार रवींद्र नाट्य मंदिरचा पडदा; तीन नवीन लिफ्ट बसवणार

By संजय घावरे | Published: June 11, 2024 08:13 PM2024-06-11T20:13:51+5:302024-06-11T20:15:44+5:30

पावसाळ्यात केली जाणार अंतर्गत कामे.

Ravindra Natya Mandir curtain to open after August Three new lifts will be installed | ऑगस्टनंतर उघडणार रवींद्र नाट्य मंदिरचा पडदा; तीन नवीन लिफ्ट बसवणार

ऑगस्टनंतर उघडणार रवींद्र नाट्य मंदिरचा पडदा; तीन नवीन लिफ्ट बसवणार

मुंबई - नूतनीकरणाच्या कामासाठी मागील जवळपास आठ महिन्यांपासून बंद असलेल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नाटक बघण्यासाठी आतुरलेल्या प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची गती आणि पावसाच्या आगमनामुळे रवींद्र नाट्य मंदिराचा पडदा ऑगस्टनंतर उघडू शकेल अशी माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे.

मागच्या वर्षी २५ ऑक्टोबरनंतर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आठ महिन्यांपासून रवींद्र नाट्य मंदिरामध्ये एकाही नाटकाचा प्रयोग झालेला नाही. सुरूवातीला मार्चपर्यंत संपूर्ण काम पूर्ण करून नाट्यगृह आणि अकादमीचा परिसर रसिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण काम पूर्ण होऊ शकले नाही. 

त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात वेगात कामे पूर्ण करून ३१ मेनंतर नाट्यगृह खुले करण्याचे उद्दीष्ट अकादमीचे होते, पण अद्याप कामे सुरूच आहेत. अकादमीच्या कामाचा पसारा खूप मोठा असून, एकमेकांशी कनेक्टेड असलेली लहान-सहान कामे करण्यासाठीही खूप वेळ लागत असल्याचे अकादमीच्या व्यवस्थापनाकडून समजले आहे. पावसाळ्यामुळे बाहेरील कामाला मर्यादा आल्या असून, अंतर्गत कामे वेगात केली जाणार आहेत. मुख्य आणि मिनी नाट्यगृहांसोबतच संपूर्ण ईमारतीच्या वॅाटरप्रूफींगचे काम केले गेले आहे. सहाव्या मजल्यापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या मजल्यावर असलेली गानसम्राज्ञी लता मंगेशकर युनिव्हर्सिटी पहिल्या मजल्यावर शिफ्ट केल्यावर दुसऱ्या मजल्याचे काम हाती घेण्यात येईल. 

प्रशासकीय इमारतीचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. अकादमीचे कार्यालय, कलांगण तसेच मुख्य नाट्यगृहातील छताचे काम पूर्ण झाल्यावर रंगमंचावरील कामे, ऑडिओ, प्रकाश योजना तसेच खुर्च्या बसवण्याची कामे शेवटी करण्यात येतील.

ऑडीओ कॅलिब्रेशनसाठी वेळ लागणार आहे. तीनही लिफ्ट नवीन बसवण्यात येणार आहेत. लिफ्ट आल्या असल्या तरी त्या बसवल्यानंतर महिनाभर तपासणी केली जाईल. पु. ल. देशपांडेंच्या पुतळ्याची जागा बदलण्यात येणार आहे. पुतळा सध्या झाकून ठेवण्यात आला असून, अद्याप हलवण्यात आलेला नाही.
मुख्य नाट्यगृहातील लाकडी फ्रेम्स काढून टाकण्यात आल्या असून, फॅाल सिलिंग, अॅकॉास्टिक्सचे काम बाकी आहे. मेकअप रूम्स मोठ्या केल्या आहेत. सर्व स्वच्छतागृहे नवीन करण्यात आली आहेत. व्हीआयपी रूमच्या फर्निचरचे काम सुरू आहे. मुख्य नाट्यगृहातील स्टेप्सची उंची वाढवण्यात आली आहे. 

Web Title: Ravindra Natya Mandir curtain to open after August Three new lifts will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई